प्रयागराज कुंभपर्व २०२५
महामंडलेश्वर स्वामी अनंतानंद सरस्वती, श्री पंचायती आखाडा, महानिर्वाणी

प्रयागराज, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल. यासाठीच आखाड्यांची निर्मिती केली गेली आहे. देशातील आधीच्या नेतृत्वाने तुष्टीकरणाचे राजकारण करून हिंदूंचे दमन केले. आज कालानुरूप नवीन नेतृत्व आले आहे. हिंदु राष्ट्र होण्याकडे देश मार्गस्थ झाला आहे. हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे वक्तव्य श्री पंचायती आखाडा, महानिर्वाणीचे महामंडलेश्वर स्वामी अनंतानंद सरस्वती यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, तसेच समितीचे महाराष्ट्र राज्य अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली. त्या प्रसंगी त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.

महामंडलेश्वर स्वामी अनंतानंद सरस्वती यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला निश्चित साहाय्य करू’, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून पुष्कळ चांगले कार्य चालू आहे. समितीच्या कार्याला अनेक शुभेच्छा ! असेच निरंतर कार्य करत राहा. जिथे आमची आवश्यकता पडेल, तिथे आम्ही तुम्हाला निश्चित साहाय्य करू.’’