मराठी भाषा आणि संस्कृती जपली तरच जग आपली दखल घेईल ! – राज ठाकरे

राज ठाकरे

पुणे – पूर्वी साहित्यिक राजकीय विषयांवर मत मांडायचे; मात्र हल्ली कुणी बोलत नाही. साहित्यिकांनी चांगले, वाईट काय आहे हे सांगून समाजाला मार्गदर्शन करायला हवे. सरकार कुणाचेही असो साहित्यिकांनी राजकीय विषयांवरही बोलले पाहिजे. मराठी भाषा आणि संस्कृती जपली तरच जग आपली दखल घेईल, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांना केले. राज्यशासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या तिसर्‍या विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांना ठाकरे यांच्या हस्ते ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठीसाठी आम्ही जे करू त्याला पाठिंबा द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करून गुन्हे दाखल करू नका, अशी टिप्पणीही ठाकरे यांनी या वेळी केली. शिक्षण, धाडस आणि इच्छाशक्ती या त्रिसूत्रीला तंत्रज्ञानाचा उपयोग आणि संशोधनाची जोड दिल्यास मराठी तरुण यशस्वी होईल. मराठी साहित्यामध्ये अधिकाधिक महिलांनी लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हायला हवे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.