मकरसंक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी लहान बाळाचे ‘बोरन्हाण’ करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी हळदीकुंकू आणि बोरन्हाण समारंभ झाले. या समारंभात परंपरा जपण्यापेक्षा दिखाऊपणाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. या छोटेखानी; पण आनंद देणार्या समारंभात इतरांनी केले, त्यापेक्षा निराळे करण्याची वृत्ती वाढलेली दिसते. निरनिराळी सजावट, रुखवताप्रमाणे बाळाच्या वस्तूंची मांडणी, त्याचे चित्रीकरण, तसेच महिलांचा आधुनिक पद्धतीने शृंगार यांकडेच अधिक लक्ष दिले जाते.
खरेतर लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे; म्हणून१ ते ५ या वयात बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. हा एक ‘शिशुसंस्कार’ आहे, असे आपण म्हणू शकतो. बोरन्हाण का करायचे ? या संदर्भात अशी आख्यायिका आहे की, करी नावाच्या राक्षसाची वक्रदृष्टी मुलांवर पडू नये, त्यासाठी सर्वांत प्रथम श्रीकृष्णाला बोरन्हाण घातले गेले. खाली स्वच्छ आसन घालून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाट ठेवून, बाळाला त्यावर बसवून बाळाचे औक्षण केले जाते. औक्षण करतांना ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी कार्यरत होतात आणि हातात धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे आकर्षिल्या जातात. ओवाळतांना अंगठीकडून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे बाळाच्या सभोवताली संरक्षककवच निर्माण होते. विश्वातून भूमीवर प्रक्षेपित होणार्या आध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दीपज्योतीच्या प्रकाशात अधिक क्रियाशील होतात; म्हणून औक्षण केले जाते. दिव्यातून बाहेर पडणारे किरण बाळाचे रक्षण करत असतात, म्हणजेच अग्नितत्त्वात वाईट नकारात्मक शक्ती जाळण्याचे कार्य या औक्षणासाठी प्रज्वलित केलेले निरांजन करते. औक्षणानंतर बाळाच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, हरभरा, करवंद, गाजराचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, मुरमुरे, बत्तासे हळूवार टाकले जातात. बाळाला या वस्तूंनी जणू न्हाऊ घातले जाते. संक्रांतीनंतर वातावरणातील उष्मा वाढू लागतो, ही पुढे येणार्या उन्हाळ्याची चाहूल असते. वर उल्लेखलेल्या वस्तूंमधील आपतत्त्व बाळाच्या शरिराला पालटत्या ऋतूच्या परिणामांपासून अबाधित ठेवते. एवढ्या वस्तू खाली पडतांना बघून मुले ती वेचून खातात, त्यामुळे त्यांना नवीन फळे खाण्याची सवय लावणे सोपे होते. गेल्या काही वर्षांत या सोहळ्यात उपरोक्त वस्तूंपेक्षा विविध प्रकारची चॉकलेट, छोटी बिस्किटे यांचा वापर अधिक होतांना दिसतो. नंतर आमंत्रित मुलांनाही विदेशी चॉकलेट देतात. परंपरांना फाटा देऊन दिखाऊपणा करण्याच्या नादात आपण आपल्या पाल्यांची आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याची अपरिमित हानी करत आहोत, हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.