Prayagraj Kumbh Parva 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

महाकुंभाच्या भूमीत संत-महंत यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय !

 श्री. सचिन कौलकर आणि श्री. किशोरकुमार जगताप, विशेष प्रतिनिधी

महासंवाद सोहळ्यात उपस्थित असलेले संत-महंत

प्रयागराज – श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आणि श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी गावोगावी आणि घराघरांत ‘महासंवाद’ चालू करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रयागराज महाकुंभक्षेत्री पार पडलेल्या ‘महासंवाद’ सोहळ्यात घेण्यात आला. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती न्यासाच्या नेतृत्वाखाली महासंवादाचा सोहळा पार पडला. मंदिर मुक्ती आंदोलनाला अधिक गती देण्यासाठी ११ सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यावरही सर्व संत-महंत यांचे एकमत झाले आहे. उपस्थित संत-महंतांनी हिंदूंना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, तसेच मथुरा येथील मशीद लवकरच हटवून तेथे एक भव्य मंदिर बांधले जाईल, असा विश्‍वास हिंदूंना दिला गेला. यासाठी हिंदु समाजाने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती न्यासांसमवेत खांद्याला खांदा लावून उभे रहाण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रयागराज महाकुंभक्षेत्री १ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १ वाजता सेक्टर क्रमांक १६ येथे श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्‍वरमाऊली सरकार यांच्या श्री रुक्मिणी विदर्भ पिठाच्या वतीने हा महासंवादाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

उपस्थित संत-महंत…

या कार्यक्रमाला श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्‍वरमाऊली सरकार, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष श्री. महेंद्र प्रताप सिंह, श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचे पिठाधीश्‍वर स्वामी राजेश्‍वरमाऊली सरकार अध्यक्ष श्री. सुरेश पाटील, अधिवक्ता अर्जुन सिंह, श्री. नरेंद्र मौर्य, क्रांतीकारी संत सत्यमित्रानंद आदी उपस्थित होते. या सोहळ्यात ‘जय श्रीराम, श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीचा विजय असो, भारत माता की जय, जय श्रीराम, हर हर महादेव’ अशा दिलेल्या उद्घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु स्वामी श्री राजेश्‍वरी माऊली सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महासंवाद कार्यक्रमात संयोजक तथा न्यासाचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मंदिर तोडून भगवानाच्या मूळ गर्भगृहावर बनवलेली मशिदीच्या इतिहासावर प्रकाश टाकून निधर्मी लोकांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती शंकराचार्य, महामंडलेश्‍वर, पीठाधीश्‍वर आणि साधु संतांना दिली. याच्यासमवेत न्यायालयातील खटला, मजबूत कायद्याची कारवाईच्या प्रगतीची माहिती सर्वांना दिली, तसेच या खटल्याचा मी पक्षकार असून हा खटला मीच जिंकणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण देशभरात घराघरांत महासंवाद चालवून मंदिर उभारणीविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

महासंवाद सोहळ्यात मार्गदर्शन करतांना श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्‍वर माऊली सरकार

संत-महंत यांनी व्यक्त केेलेले विचार…

१. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त होऊन भव्य मंदिर निर्माण होईपर्यंत लढा चालूच राहील ! – श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्‍वरमाऊली सरकार

हिंदु खर्‍या अर्थाने संकटात आहेत; कारण त्यांच्याच देशात त्यांच्या संस्कृतीला नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आमची संस्कृती, आमचे संस्कार आणि संस्कृती यांना नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे; म्हणून हिंदुत्व संकटात आहे. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त होईपर्यंत आणि भव्य मंदिर निर्माण होईपर्यंत हिंदूंचा हा लढा चालूच राहील !

मुसलमानांचे ‘वक्फ बोर्ड’ असू शकते, तर मग ‘सनातन बोर्ड’ का नको ?  

श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्‍वरमाऊली सरकार म्हणाले, ‘‘जर मुसलमानांचे ‘वक्फ बोर्ड’ असू शकते, तर मग ‘सनातन बोर्ड’ का असू शकत नाही ? श्रीराममंदिर होण्यासाठी ‘जय श्रीराम’ची घोषणा देण्यात आली होती. आता आपल्याला ‘जय जय श्रीकृष्ण’ म्हणत श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी लढा द्यावा लागणार आहे. काँग्रेसच्या काळात मशीद आणि चर्च यांची निर्मिती झाली. हिंदु मंदिराची हेळसांड झाली. आम्ही केवळ ३ मंदिरे मागितली होती; पण आता आमच्याकडून घेतलेले प्रत्येक मंदिर आम्ही परत घेणार आहोत. संपूर्ण विदर्भातील जनता मंदिर निर्माण करण्यासाठी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासासमवेत आहे. तेथे प्रत्येकजण लढायला सिद्ध आहे. मंदिर निर्माण करण्यासाठी जनचेतना आणि महासंवाद अभियान घराघरात चालवण्याचा संकल्प केला आहे. ’’

२. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा लढा हा भक्त आणि त्यांची भक्ती यांची परीक्षा घेणारा लढा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष हा आपल्या देवाला मुक्त करण्याचा संघर्ष आहे. भगवान श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. तो सर्व प्रकारांच्या संघर्षावर लवकरात लवकर मात करून धर्मसंस्थापना करणार आहे. ‘सुदामा भक्त बनून आल्यावर श्रीकृष्ण त्याला ३ मुठी पोह्यांच्या बदल्यात त्रिलोक देऊ करतात; पण कंस, शिशुपाल आणि जरासंद उन्मत्त होऊन त्याच्या समोर आल्यावर त्यांची काय स्थिती झाली’, हे आपण जाणतोच. हा लढा म्हणजे भक्तांची आणि त्यांच्या भक्तीची परीक्षा आहे. त्यासाठी तुम्ही सिद्ध आहात ना ? संघटित होणार ना ?
असे म्हटल्यावर संत आणि भाविक यांनी हात वर करून सिद्ध आहे, असे म्हटले.

३. भविष्यात सर्व मंदिरांच्या मुक्तीसाठी हिंदूंना एकत्र येऊन योगदान द्यावे लागणार ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

मंदिर हेच आपल्या धर्म आणि संस्कृती यांची आधारशीला आहेत. परकीय आक्रमक जेव्हा आले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम मंदिरांवर आक्रमण केले. मूर्तींची विटंबना केली. इंग्रज जेव्हा आले, तेव्हा त्यांनीही आपल्या मंदिरांवर नियंत्रण मिळवून हिंदूंचे धर्मांतर केले. आता धर्मनिरपेक्ष लोकशाहीत आमच्या मंदिरांना धन कमावण्याचे साधन बनवले आहे. अनादी काळापासून जेव्हाधर्मावर संकट येते, तेव्हा तेव्हा गुरु-शिष्य परंपरा आणि संतांनी समोर येऊन धर्माचे रक्षण आणि कार्य केले आहे. संतांच्या संकल्पनेने लवकरच आपल्याला श्रीकृष्ण मंदिर मिळणारच आहे. हा गोवर्धन आधीच उचलला गेला आहे; पण त्याला काठी लावणे हे आपले दायित्व आहे. याप्रमाणे भविष्यात सर्व मंदिरांच्या मुक्तीसाठी आपल्याला एकत्र येऊन आपापले योगदान द्यावे लागणार आहे. त्याचा संकल्प  करूया.

४. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती झाली पाहिजे, यासह हिंदु राष्ट्राची स्थापनाही होणे आवश्यक ! – सुनील घनवट, महासंघटक, हिंदु जनजागृती समिती

अयोध्या येथे श्रीराममंदिर उभारले, तरी अजून काशी, मथुरेसह देशातील ४ लाख मंदिरांची सुटका हिंदूंना करावी लागणार आहे. देशात मशीद, चर्च सरकारच्या नियंत्रणात नाही; मात्र हिंदूंची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. ही मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात आली पाहिजेत. आता संतांच्या उपस्थितीत आपल्याला श्रीकृष्ण मंदिर मुक्ती अभियान घ्यावे लागते, हे दुर्भाग्य आहे. सर्वांना माझा संदेश आहे की, श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती झाली पाहिजे, यासह हिंदु राष्ट्राची स्थापनाही होणे आवश्यक आहे.

४. धर्मसंस्थापनेचा काळ जसा पुढे जाईल, तशी श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त होईल ! – श्री. चेतन राजहंस

गोवा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी काशी, मथुरा येथे मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. धर्मसंस्थापनेचा काळ चालू झाला आहे. धर्म संस्थापनेचे कार्य पुढे जाईल, तेव्हा मथुरा येथे श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त होईल.

श्रीकृष्ण जन्मभूमी

महासंवादातील इतर संतांचे मार्गदर्शन…

१. शंकराचार्य नरेंद्रानंद सुमेरु पीठाधीश्‍वर श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करण्यासाठी या न्यासाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचे आवाहन करतांना म्हणाले की, हिंदु समाज आता जागृत झाला आहे. या जन्मभूमीवर घेतलेला ताबा मुक्त केल्याविना मागे हटणार नाही. याचा प्रारंभ झालेला आहे. जगद्गुरु शंकराचार्य श्री रामानंदआचार्य म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रिया वेगळी आणि हिंदु समाजाचा आवाज वेगळा आहे. अयोध्या येथे ज्याप्रमाणे श्रीरामाचे मंदिर बांधले गेले, त्याप्रमाणे मथुरा येथे मूळ गर्भ गृहावर भगवान श्रीकृष्णाचे मंदिर बांधले पाहिजे, अशी हिंदु समाजाची इच्छा आहे. जगद्गुरु वल्लभाचार्य म्हणाले की, अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा न्यायालयीन लढा जिंकून मंदिराची निर्मितीही केली जाईल.

२. स्पेन येथून आलेले संत उमेश योगी म्हणाले की, हा महासंवाद सोहळा कुंभपुरताच मर्यादित रहाणार नाही, तर ज्या दिवशी प्रत्येक घरात श्रीकृष्ण मंदिराचा महासंवाद चालू होईल, तेव्हापासून मंदिराची निर्मिती निश्‍चित आहे. देशभर गल्लोगल्ली पोचवला जाईल.

३. संत विजय विठ्ठल द्वाराचार्य, बलरामदास डॉ. आदित्यानंद महाराज, श्री अभयनाथ महाराज, श्री बालकनाथचार्य म्हणाले, ‘‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीच्या विषयी हिंदु समाज झोपलेला आहे, असे कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत. हेच याचे प्रमाण आहे.’’

४. क्रांतीकारी संत सत्यमित्रा नंद महाराज म्हणाले की, श्री. महेंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत श्रीकृष्णाच्या मंदिर निर्माण करण्यासाठी ही लढाई हिंदु समाज जिंकेल आणि भव्य मंदिरही बनेल.

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती

महासंवादातील निर्धार !

महाकुंभामधील या महासंवाद सोहळ्यात संपूर्ण विदर्भ आणि ब्रज प्रदेशातील लोकांनी मंदिर उभारणीसाठी आपले संपूर्ण समर्थन घोषित केले. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसह पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.

सर्व भाविकांनी जात-पात विसरून लढा यशस्वी करण्याचे आवाहन !

या महासंवाद सोहळ्यात श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती तथा मंदिर निर्माण महासंवाद कार्यक्रमात अनेक संत-महंत, महामंडलेश्‍वर यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी संघटित होऊन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीच्या न्यायालयीन लढ्याला सर्व संत-महंत, महामंडलेश्‍वर यांनी पाठिंबा असल्याचे घोषित केले, तसेच या लढ्याला विरोध करणार्‍या निधर्मीवाद्यांना त्यांच्याच भाषेत ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा संकल्पही या कार्यक्रमात करण्यात आला. सर्व भाविकांनी जात-पात विसरून या लढ्यात सहभागी होऊन हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन सर्व संत-महंत महामंडलेश्‍वर यांनी केले.