साप्ताहिक ‘मावळ मराठा’चा २१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !

मुंबई, २० एप्रिल (वार्ता.) – साप्ताहिक ‘मावळ मराठा’चा २१ वा वर्धापनदिन १९ एप्रिल या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. या वेळी प्रसिद्ध चित्रकार, साहित्यिक प्रदीप म्हापसेकर यांचा ‘मावळ मराठा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, साप्ताहिक ‘मावळ मराठा’चे संपादक श्री. सदानंद खोपकर आणि त्यांना साप्ताहिकाच्या प्रकाशनामध्ये महत्त्वाचे योगदान देणार्या श्री. सदानंद खोपकर यांची पत्नी सौ. सीमांतिनी खोपकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

श्री. सदानंद खोपकर यांनी या सोहळ्याचे प्रास्ताविक केले. साप्ताहिक ‘मावळ मराठा’ वृत्तपत्र काढतांना आलेल्या अडचणी आणि त्यांवर केलेली मात अशा प्रकारच्या मागील २१ वर्षांच्या वाटचालीचे अनुभव श्री. सदानंद खोपकर यांनी या वेळी सांगितले. श्री. सदानंद खोपकर यांच्या ‘एकावन्नी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. हा काव्यसंग्रह म्हणजे श्री. सदानंद खोपकर यांचे २५ वे पुस्तक होय. यामध्ये एकूण ५१ काव्यरचनांचा समावेश आहे. साप्ताहिक ‘मावळ मराठा’चे वाचक, श्री. सदानंद खोपकर यांचे पत्रकार मित्र आणि खोपकर कुटुंबीय उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना संदीप चव्हाण म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात वृत्तपत्र काढणे आणि ते २१ वर्षे चालवणे हे अत्यंत कठीण आहे. सदानंद खोपकर हे पत्रकारितेचे व्रत म्हणून हे वृत्तपत्र चालवत आहेत.’’
प्रदीप म्हापसेकर यांनी पुरस्कार प्रदान केल्याच्या प्रकरणी ‘मावळ मराठा’च्या कार्यकारिणीविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी कु. हर्षिता खांडेकर या पनवेल येथील इयत्ता ४ थीमध्ये शिकत असलेल्या मुलीने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांवरील वीरश्रीयुक्त पोवाडा सादर केला.
या वेळी जगदीश भुवड, कवीवर्य लोकनाथ यशवंत, राही भिडे आदी मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.