वाढदिवसानिमित्त २ शाळांत ५० सहस्र रुपयांच्या साहित्याचे वाटप

मालवण – तालुक्यातील कट्टा, तिरवडा फाटा येथील धर्मप्रेमी सौ. मिथिला नागवेकर यांच्या पुढाकाराने त्यांचे पती श्री. संजीव नागवेकर यांच्या ६५ व्या आणि मुलगा निरंजन नागवेकर यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूल अन् कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळांतून संस्कार वह्या आणि सनातनचे ग्रंथ मिळून एकूण ५० सहस्र रुपयांचे साहित्य विद्यार्थ्यांना दिले. या माध्यमातून मुलांवर संस्कार होऊन त्यांना अध्यात्माविषयीचे ज्ञान मिळावे, या हेतुने नागवेकर कुटुंबीय करत असलेल्या प्रयत्नांचे शिक्षक आणि संस्था पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केले. ओरोस येथील सनातन संस्थेचे साधक श्री. आणि सौ. सुमन पुंडलिक गवस यांनी साधना आणि अर्पण करण्याचे महत्त्व विषद केल्यावर नागवेकर कुटुंबियांनी ही सेवा केली.
श्री. आणि सौ. नागवेकर कुटुंबियांचे अशा प्रकारे सनातनचे साहित्य शाळांमध्ये मोठ्या संख्येने वितरण करण्याचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी सौ. मिथिला नागवेकर यांनी शाळेत २५ सहस्र रुपये अर्पण मूल्याच्या संस्कार वह्यांचे वितरण कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे श्री. नागवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते. यावर्षी २६ मार्च यादिवशी श्री. निरंजन यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांनी ‘अभ्यास कसा करावा ?’ या ग्रंथांचा ३२५ प्रतींचे वितरण ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे केले. या वेळी श्री. निरंजन यांचा वाढदिवस भारतीय संस्कृतीनुसार रामरक्षा म्हणून औक्षण करून साजरा करण्यात आला. ओरोस हायस्कूलमधील १९० विद्यार्थी आणि १७ शिक्षक उपस्थित होते.
श्री. संजीव नागवेकर यांचा ६ एप्रिल या दिवशी वाढदिवस होता. यानिमित्ताने कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथे २५ सहस्र रुपये किमतीच्या ७८५ संस्कार वह्यांचे वितरण केले. या वेळी श्री. नागवेकर यांचा वाढदिवस भारतीय संस्कृतीनुसार साजरा करण्यात आला. या वेळी कसाल हायस्कूलमधील ४०० विद्यार्थी, ४० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या हायस्कूलमधील शिष्यवृत्ती प्राप्त ४ विद्यार्थ्यांचा सत्कार नागवेकर यांनी रोख रक्कम देऊन केला.
कसाल हायस्कूलच्या वतीने हायस्कूलचे सचिव यशवंत परब यांनी श्री. नागवेकर यांचा, तसेच सौ. नागवेकर यांचा सत्कार सौ. सुमन गवस यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी श्री. आणि सौ. नागवेकर यांना ‘श्रीकृष्णा’ची मोठी प्रतिमा भेट देण्यात आली. साधक श्री. आणि सौ. गवस यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. सौ. नागवेकर यांनी अमेरिकेत मुलांना देण्यासाठी ‘अभ्यास कसा करावा ?’ हे १५ आणि ‘बोधकथा’ हे १० अशा इंग्रजी भाषेतील एकूण २५ ग्रंथांची मागणी केली आहे. सनातन संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात नागवेकर कुटुंबिय सहभागी होतात. सनातन संस्थेच्या कार्याविषयी त्यांना अत्यंत आदर आहे.