पौष कृष्ण त्रयोदशी (२७.१.२०२५) या दिवशी फोंडा (गोवा) येथील सौ. सुनीती आठवले (सनातन संस्थेचे १०१ वे व्यष्टी संत पू. अनंत (भाऊकाका) आठवले यांच्या धर्मपत्नी) यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांची सेवा करणारी रामनाथी आश्रमातील साधिका कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १६ वर्षे) हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. प्रेमभाव
अ. ‘सौ. आठवलेकाकू पुष्कळ प्रेमळ आहेत. त्यांच्या प्रेमभावामुळे पू. भाऊकाका यांच्या सेवेतील साधिकांना त्या वातावरणाशी समरस होणे सोपे जाते.
आ. काकूंकडे सेवेला येणार्या सर्व साधिकांची काकू प्रेमाने विचारपूस करतात. एखादी साधिका बरेच दिवस आली नाही किंवा घरी गेली असेल, तर त्या भ्रमणभाष करून ‘ती बरी आहे का ?’, असे विचारतात.
इ. साधिकांशी बोलतांना काकू अगदी सहजतेने बोलतात. ‘त्यांच्याशी बोलतांना आपण आपल्या कुटुंबियांपैकी कुणाशी तरी बोलत आहोत’, असे वाटते.
ई. त्यांची सेवा संपल्यावर आम्ही गाडीने आश्रमात येतो. आम्हाला गाडीने जायला उशीर होऊ नये; म्हणून काकू आम्हाला जमेल तेवढे सहाय्य करतात.
उ. आमचा वेळ वाचावा; म्हणून त्या आम्ही करायच्या सेवांची पूर्वतयारी करून ठेवतात.
२. चिकाटी

काकूंमध्ये सेवा पूर्ण करण्याची चिकाटी आहे. हाती घेतलेली सेवा परिपूर्ण होईपर्यंत त्या चिकाटीने प्रयत्न करत असतात, तसेच ‘ती सेवा कशी पूर्ण होऊ शकेल ?’, यासाठी उपाययोजना काढतात.
३. परिपूर्ण नियोजन
काकूंना सेवेला असणार्या साधिकेकडून एखादी वेगळी सेवा करून घ्यायची असेल, तर ‘त्या साधिकेला कधी वेळ असेल ? तिला सेवा अधिक होईल का ?’, या सगळ्यांचा विचार करून व्यवस्थित नियोजन करून त्या सेवा सांगतात.
४. काटकसरीपणा
काकू सगळ्या गोष्टी काटकसरीने वापरतात. कुठलीच गोष्ट वाया जाऊ देत नाहीत. त्यांच्याकडे औषधांच्या बाटल्यांवरील झाकणे साठली होती. त्यांपासून त्यांनी भिंतीवर लावण्याचे ‘वॉल पिस’ (भिंतीवर लावण्याची शोभेची वस्तू) बनवले. अशा प्रकारे त्यांनी बर्याच टाकाऊ गोष्टींचा उपयोग केला आहे.
५. नीटनेटकेपणा
काकूंचे सर्व साहित्य ठरलेल्या जागी असते. घेतलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी जागेवर ठेवणे त्यांच्या अंगवळणी आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आणि व्यवस्थित असतात.
६. श्रीकृष्णाप्रती भाव
काकूंचा श्रीकृष्णाप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांना वेळ असतो, तेव्हा त्या श्रीकृष्णाचे भजन ऐकतात. ‘भजन ऐकतांना त्या त्यात रममाण झाल्या आहेत’, असे मला जाणवते. त्या मला सांगतात, ‘श्रीकृष्णाचे भजन ऐकताना आनंदाची अनुभूती येते आणि ‘मी कृष्णासमवेतच आहे’, असे मला वाटते.’ त्यांच्या देव्हार्यात श्रीकृष्णाची लहान मूर्ती आहे. त्या मूर्तीला काकूंनी स्वतः वस्त्रे शिवली आहेत. मुकुट, दागिने इत्यादी स्वतः बनवले आहेत आणि मूर्तीची अगदी सुंदर सजावट केली आहे. त्या मूर्तीकडे बघून भाव पुष्कळ जागृत होतो.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला पू. भाऊकाका आणि सौ. आठवले काकू यांची सेवा करून त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली आहे. त्याकरिता मी गुरुचरणी कृतज्ञ आहे. ‘मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे कृतीत आणता येऊ दे’, ही गुरुचरणी प्रार्थना आहे.’
– कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०२४)