
ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या एका फुटलेल्या (लिक झालेल्या) सरकारी अहवालानुसार त्याने देशातील धोकादायक संघटनांमध्ये इस्लामी, खलिस्तानी यांच्यासह हिंदु राष्ट्रवादी संघटनांनाही धोकादायक ठरवले आहे. या अहवालामध्ये ‘खलिस्तान चळवळ आणि हिंदु राष्ट्रवाद हे अतिरेकाचे नवीन स्वरूप आहे’, असे वर्णन केले आहे. गतवर्षी ब्रिटनच्या गृहसचिव यवेट कूपर यांनी आतंकवादाविषयी सरकारी धोरणाचा आढावा घोषित केला होता. ‘रॅपिड अॅनालिटिकल स्प्रिंट’ नावाचा हा आढावा इंग्लड येथील अतिरेकी गटाचा शोध घेईल आणि त्याचे निरीक्षण करील. आतंकवादी गटांना पायबंद घालण्यासाठी लक्ष ठेवणार, आतंकवाद विरोधासाठी एक नवीन धोरणात्मक दृष्टीकोन प्रस्तावित करील’, असे त्यांनी म्हटले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये याविषयी एक समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीने बनवलेला अहवाल फुटला असून त्यामध्ये हिंदु राष्ट्रवाद हा वाढता धोका म्हणून मांडण्यात आला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने बनवलेला अहवाल म्हणजे ब्रिटनचा हिंदुत्वाला आणि हिंदु राष्ट्रवाद यांना आतंकवादी संबोधून हिंदूंच्या अस्तित्वाला नकार देणारा आहे. या अहवालातील आतंकवादी सूचीमध्ये इस्लामी आतंकवादी, खलिस्तानी आतंकवादी, उजव्या विचारसरणीचे, डाव्या विचारसरणीचे, महिलांवरील हिंसाचारी, हिंदु राष्ट्रवादी, पर्यावरणीय आतंकवादी, अराजकतावादी, हिंसक प्रवृत्तीचे आकर्षण असणारे यांचा समावेश करण्यात आला आहे.
अहवालातील या सूचीवरून एके काळी जगावर राज्य करण्याची मनीषा बाळगणारा ‘ग्रेट ब्रिटन’ किती उतरंडीला आला आहे, हे लक्षात येते. इस्लामी आतंकवादी, खलिस्तानी आतंकवादी यांच्यात आणि हिंदु राष्ट्रवादी यांच्यात ब्रिटनला काहीही भेद जाणवत नाही म्हणजे ब्रिटनची बुद्धी भ्रष्ट झाली आहे अन् त्याने हिंदुविरोधाचा चष्मा जाणीवपूर्वक घातला आहे, हे लक्षात येते. ब्रिटन किती रसातळाला गेला आहे, त्याची विदारक स्थिती ‘ब्रेक्सिट’ (युरोपिअन युनिअनमधून बाहेर पडणे) होऊनही सुधारत नाही, हे लक्षात येते. हिंदू किती सहिष्णु आहेत ? हे ब्रिटनने हिंदूबहुल भारतावर २०० हून अधिक वर्षे राज्य करून अनुभवले आहे. तेव्हाही इंग्रज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांना राजकीय बंदीवान म्हणून न पहाता कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे वागणूक द्यायचे. हिंदु राष्ट्रवाद्यांना विरोध अथवा त्यांची घृणा बाळगणे, हे ब्रिटिशांच्या रक्तातच आहे. त्यामुळे हिंदूबहुल भारताची अब्जावधी रुपयांची लूट करून समृद्ध झालेल्या, क्रांतीकारकांचा अनन्वित छळ करून त्यांना फाशी देणार्या, ठार करणार्या ब्रिटनने याविषयी क्षमा मागितलेली नाही किंवा भारताची संपत्ती भारताकडे पुन्हा सोपवण्याविषयी काही कृती केली. अशा ब्रिटनने हिंदु राष्ट्रवाद्यांना आतंकवादी ठरवल्याविषयी त्याचा कितीही निषेध केला, तरी तो अल्पच आहे. फार वर्षांपूर्वी भारताची समृद्ध साधनसंपदा लुबाडून भारताला ख्रिस्ती बनवण्याचे त्यांचे मनसुबे होते. भारताला म्हणजेच हिंदूंना हीन लेखण्याची ब्रिटीश संधी शोधत असतात. अशा अहवालांमधून या गोष्टी पुनःपुन्हा समोर येतात.
हिंदूंचा द्वेष !
ब्रिटनमध्ये हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी हिंदू आणि मुसलमान यांच्यात वर्ष २०२२ मध्ये इंग्लडमधील लिस्टर येथे झालेल्या एका दंगलीचा संदर्भ दिला आहे. लिस्टर येथील एका क्रिकेट सामन्यावरून मुसलमान आणि हिंदू यांच्यात संघर्ष झाला होता. वास्तविक भारताचाही विचार करता दंगली कोण घडवते ? हे दंगली करणार्यांना आणि इतरांनाही ठाऊक आहे. ब्रिटनमध्ये हिंदूंनी जिहाद्यांची आक्रमणे झेलायची, संपत्तीची हानी, जीवितहानी भोगायची आणि वर ब्रिटन सरकारचे ‘आतंकवादी’ हे ‘लेबल’ही लावून घ्यायचे ! वास्तविक ब्रिटनमध्ये झालेल्या दंगलींमध्ये हिंदूंची हानी झाली; मात्र ब्रिटन सरकारने पीडित आणि पीडा देणारे यांना एकाच मापात तोलले ! हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणून हिणवणे, हे ब्रिटिशांची बुरसटलेली मानसिकता दर्शवते. हे कशाचे फलित आहे ? स्वतःला सुधारणावादी किंवा धर्मनिरपेक्षतावादी म्हणवणार्या ब्रिटनच्या सरकारची किंवा तेथील समाजाची विचारसरणी किती हलकी असू शकते ? यावरून एक सूत्र स्पष्ट होते, ती म्हणजे जगाच्या पाठीवर ज्या देशांना निधर्मीवाद किंवा सर्वधर्मसमभाव यांच्या विषाणूंची लागण झाली आहे, त्या देशांच्या सरकारांची, तसेच तेथील समाजाची सद़्सद़्विचार करण्याची क्षमताच हरवून जाते. ब्रिटनने सादर केलेल्या या अहवालातून हे दिसून येते.
ब्रिटनमध्ये इस्लामी ‘ग्रूमिंग गँग’ने सहस्रो ब्रिटीश अल्पवयीन मुलींचे लैंगिग शोषण केल्याचे या मुलींपैकी काहींनी पुढे येऊन सांगितले आहे. पाक येथून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेले जिहादी वास्तविक ९० च्या दशकापासून ब्रिटीश मुलींना हेरून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. जिहादी ब्रिटीश नागरिकांवर आक्रमणे करत आहेत. जाहीररित्या ‘अल्लाला मानणार नसाल, तर ठार केले जाल’, असे फलक मोर्च्यांमध्ये हातात धरले जातात. ब्रिटनमध्ये जिहादींची संख्या एवढी वाढली आहे की, त्यांच्या भागातील ते त्यांचा खासदार ठरवू शकतात. पाकमधील मुसलमानांची संख्या तेथे सर्वाधिक आहे. पाकप्रेमी हिंदू भारत आणि हिंदु राष्ट्र भारत यांचा द्वेष करतात. त्यामुळे साहजिकच पाकप्रेमींचे वर्चस्व वाढलेल्या ब्रिटनला हिंदु राष्ट्रवादी आतंकवादी वाटतात. ब्रिटनमध्ये जिहादी लोक हिंदूंवर आक्रमणे करतात. वर्ष २०२४ मध्ये जिहाद्यांकडून ब्रिटनमध्ये घडवलेल्या दंगलीतील ५० हून अधिक पोलीस घायाळ झाले होते. हिंदूंनी कधी अशा दंगली घडवल्या आहेत का ? ब्रिटनची वृत्तवाहिनी बीबीसी तरी अयोध्येत श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या कार्यक्रमाविषयी आणि अन्य वेळीही हिंदूंविरोधी, भारतविरोधी वार्तांकन करते. बीबीसी भारतातील दंगलखोर जिहाद्यांविषयी ममत्व बाळगून हिंदुत्वनिष्ठांना मात्र ‘अत्याचार करणारे’, असे चित्र रंगवते. हिंदु राष्ट्रवाद्यांना आतंकवाद्यांच्या सूचीत घालणार्या इंग्लडचा भारत सरकारने कठोर शब्दांत निषेध करून त्याच्यावर जरब बसवली पाहिजे. ब्रिटनच्या भरभराटीत योगदान देणार्या आणि तेथे वास्तव्य करणार्या हिंदूंनीही ब्रिटन सरकारकडे निषेध नोंदवणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्रवाद्यांना आतंकवादी सूचीत घालणार्या ब्रिटनला भारत सरकार जाब विचारणार कि नाही ? |