Anand Dave Slams Trupti Desai : हिंदु धर्मात लुडबूड करू नका !

  • हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची तृप्ती देसाई यांना सडेतोड चेतावणी !

  • सिद्धिविनायक देवस्थानने जे ठरवले आहे, तो त्यांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन  

  • सिद्धिविनायक देवस्थानने लागू केलेल्या वस्त्रसंहितेला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा विरोध !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई व हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे

मुंबई – एखाद्या मंदिरामध्ये जातांना कुणी काय परिधान करावे, कसे रहावे, हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या देवस्थानांना असतो. तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्यात पडू नका. श्री सिद्धिविनायक देवस्थानाने जे काही ठरवले आहे, तो त्याचा अधिकार आहे आणि तसे नियम आवश्यकच आहेत. तुम्ही त्यात ढवळाढवळ करू नका. तुम्ही शांत रहा. धर्मात लुडबूड करू नका, अशी चेतावणी हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली आहे. (धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणारे श्री. आनंद दवे यांचे अभिनंदन ! – संपादक)

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी नुकतीच वस्त्रसंहिता घोषित केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या, ‘सिद्धिविनायक मंदिराने घेतलेला वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय लगेचच मागे घ्यावा. (असे सांगण्याचा तृप्ती देसाई यांना काय अधिकार ? त्या काय स्वतःला धर्माचे ठेकेदार समजतात का ? – संपादक) राज्यघटनेने व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. जो कुणी मंदिरात येतो, तो श्रद्धेने येत असतो. त्याचे कपडे न पहाता त्याची श्रद्धा पाहिली पाहिजे. सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात आहेत. मग हा निर्णय केवळ भक्तांनाच लागू आहे का ?’’ (धर्मशास्त्रानुसार मंदिरामध्ये पुजारी सोवळे नेसतात. असे असूनही त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणणार्‍या तृप्ती देसाई त्यांचे अध्यात्माविषयीचे अज्ञानच प्रकट करत आहेत. अध्यात्माचा गंध नाही, तर बोलायचे कशाला ? – संपादक)