हिंदूबहुल भारत देश हा जगाच्या पाठीवरील एक अद्भुत आश्चर्य आहे. भारताचा इतिहास किती आहे, याचा शोध घेतांना इतिहासालाही आश्चर्य वाटेल. भारताची व्याप्ती अखंड भारत दुभंगल्यानंतर अल्प झाली असली, तरी भारत नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या जगाला व्यापून आहे. भारताचा विचार करतांना भारताच्या केवळ अलीकडच्या काही शतकांचा विचार विद्वानांकडून केला जातो. त्यामुळे भारत आधी गरीब होता. आता विकसनशील देश बनला आहे आणि आता त्याची वाटचाल विकसित देशाकडे चालू आहे, अशी काहीशी मांडणी केली जाते. भारत वर्ष २०४७ पर्यंत विकसित देश होईल, असाही आशावाद व्यक्त केला जातो. हा चांगला भाग आहे; मात्र विकसित भारताच्या संकल्पना आणि व्याप्ती यांविषयी या लेखाद्वारे जाणून घेऊया.
संकलक : श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल.

विकासाची भारतीय संकल्पना !
आता ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचे दशक आहे. त्यामुळे त्याचाच विचार करू. विकासाची भारतीय संकल्पना काय ? असे जेव्हा ‘एआय’ला प्रश्न विचारतो, तेव्हा तो ‘भारताची मान्यता आहे की, भौतिक समृद्धीसोबतच आध्यात्मिक उन्नतीवरही लक्ष द्यावे’, असे उत्तर देतो. म्हणजे ‘एआय’लाही भारताचे वेगळेपण लक्षात येते. भारत केवळ भौतिक, आर्थिक विकासाला महत्त्व देत नसून आंतरिक विकासाला महत्त्व देतो. समाजशास्त्रानुसार विकासाचे सामाजिक विकास, आर्थिक विकास, राजकीय विकास, व्यक्तीमत्त्व विकास, शैक्षणिक विकास, सांस्कृतिक विकास असे अनेक प्रकार सांगितले आहेत. सध्या भारताची वाटचाल वेगाने आर्थिक प्रगतीकडे होत आहे. तिलाच ‘विकास’ असे मानले जात आहे.
विकास म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक आधिक्य होय. खर्या विकासासाठी सामाजिक निष्पक्षता, पर्यावरणाचे रक्षण आणि लोकांच्या आवश्यकता अन् क्षमतांची पूर्तता करून आर्थिक उन्नती आवश्यक असते.
सध्याच्या विकासाचे मोजमाप !

विकासाचे मोजमाप करतांना सध्या नागरिकांमध्ये विविध प्रकारची चर्चा असते किंवा तज्ञ अनेक गोष्टींचे दाखले देतात. देशातील २५ कोटींहून अधिक लोक द्रारिद्य्ररेषेतून बाहेर आले. काही कोटी लोकांना पक्की घरे मिळाली. देशातील मुंबई, देहली, बेंगळुरू अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘मेट्रो ट्रेन’ आली. ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’चे काम चालू आहे. अनेक दुर्गम भागात विशेषत: काश्मीर येथे १० सहस्र फुटांवर बांधलेला ९ किलोमीटरचा अटल बोगदा, जम्मू-काश्मीरमध्ये बांधलेला जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल (चिनाब पूल). चिनाब पूल नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर असून आयफेल टॉवरहून ३५ मीटर उंच आहे. आपण चंद्रयान मोहीम राबवून चंद्राच्या अखंड काळोख असलेल्या दक्षिण ध्रुवावर जगात पहिल्यांदा उतरण्याचा मान मिळवला. यासह एकाच वेळी १०० हून अधिक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याची विश्वविक्रमही केला आहे. रामेश्वरम् येथे समुद्रात उभारलेला नवीन पंबन स्वयंचलित पूल हा रेल्वे जाण्यासाठी आणि समुद्रातील वाहतुकीच्या वेळी पुलाचा मधला भाग स्वयंचलित पद्धतीने साडेतीन मिनिटांत वर जाऊ शकतो. त्यामुळे मोठ्या जहाजांना तेथून ये-जा करण्यास अडचण येणार नाही. अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो.

देशाची भौतिक प्रगती
‘ग्लोबल फिनटेच अडॉप्शन रेट’मध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा किती प्रमाणात चालते, यावर ते आधारित आहे. भारतात ८७ टक्के लोक ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधांचा उपयोग करतात. ‘फिनटेच’ उद्योगाची भ्रमणभाषद्वारे पैशांचे आदानप्रदान, ‘डिजिटल बँकिंग’ ही काही उदाहरणे आहेत. जगात दूध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारत जगातील ‘क्रमांक २’चा भ्रमणभाष उत्पादक देश आहे. ‘स्टार्ट अप इकोसिस्टम’मध्ये (नवीन लघु, मध्यम उद्योग उभारणीत) भारत अग्रस्थानी आहे. भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोचला.
‘५ जी’ तंत्रज्ञान वेगाने विकसित करून ते लागू करणारा भारत जगात ‘क्रमांक १’ वर आहे. कोरोना महामारीच्या काळात लसींचे उत्पादन करणे आणि त्यांचा पुरवठा करणे यांमध्येही भारताने जगात कौतुकाची थाप मिळवली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या ध्येयाच्या दृष्टीने अनेक वस्तू, उपकरणे, संरक्षण क्षेत्रातील लढाऊ विमानांसह, क्षेपणास्त्रे आणि अनेक शस्त्रे आपण भारतातच बनवत आहोत आणि जगात त्याची निर्यात करत आहोत.
भारताची गौरवशाली मंदिर आधारित अर्थव्यवस्था
उत्तरप्रदेश आणि बिहार अशी राज्ये गणली जात होती की, तेथून लोक कामगार म्हणून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये काम मिळवण्यासाठी, पोट भरण्यासाठी येत होते आणि अजून काही प्रमाणात येतात. तेथील अयोध्या आणि काशी येथील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला. अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी करण्यात आल्यावर आता आगरा येथील ताजमहल पर्यटकांच्या संख्येत मागे पडला आहे. वर्ष २०२२ मध्ये अनुमाने ३२ कोटी लोक उत्तरप्रदेशात आले होते. वर्ष २०२४ मध्ये मात्र अवघ्या ६ महिन्यांत ३२ कोटींहून अधिक लोक येथे आले आहेत. एकट्या जानेवारी २०२४ मध्ये तब्बल ७ कोटी लोकांनी उत्तरप्रदेशाला भेट दिली होती. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, अयोध्या आणि वाराणसी येथे पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील पर्यटन पुष्कळ वेगाने वाढत आहे. परिणामी पर्यटनावर आधारित उद्योगांचीही उलाढाल कोटींच्या घरात होत आहे.
श्रीयंत्र असलेला भारत !
श्रीयंत्र सरळ आणि उलटे त्रिकोण एकमेकांना छेदून बनते. हे श्रीयंत्र ऊर्जेचे मोठे केंद्र आहे. श्रीयंत्र बालाजी मंदिरातही आहे. भारताचा आकारच स्वत: श्रीयंत्राप्रमाणे आहे. त्यामुळे येथे ऊर्जा अखंड निर्माण होतच रहाणार, नवनिर्मिती अखंड घडत रहाणार आणि ज्या सनातन धर्माचा गौरव करतो, त्या सनातन धर्माचे रक्षक म्हणजे अवतारही याच भूमीत वारंवार होत रहातात. अवतार विदेशात जन्म घेत नाहीत; कारण भारत श्रीयंत्र म्हणजे अवतारांची भूमी आहे. याहून भारताची काही योग्यता असू शकते का ? ज्या भूमीवर विविध देवतांच्या अवतारांना पुन:पुन्हा वेगवेगळा अवतार घ्यावा वाटतो, तीच पुण्यभूमी आहे.
भारताची काही वैशिष्ट्ये !
भारतात भरड धान्याचे अनेक प्रकार आहेत. कोक, केक, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, पेस्ट्री, सूप या पलीकडे पाश्चात्त्य देशांमध्ये काही खाण्याचे प्रकार नाहीत. भारतात मुख्य पदार्थांसह २ सहस्रांहून अधिक पदार्थ आहेत. एकट्या बनारसमध्ये मिठायांचे २ सहस्रांहून अधिक प्रकार आहेत.
जगात अंदाजे ७ सहस्र भाषा बोलल्या जातात, तर भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा आहेत. असे जरी असले, तरी जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतात १९ सहस्र ५०० हून अधिक भाषा या बोली मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. एवढ्या संख्येत येथे विविध प्रकारच्या भाषा बोलणारे लोकसमूह आहेत, हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पूर्ण भारताचा विचार केल्यास काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते बंगाल, ईशान्येकडील राज्ये प्रत्येक राज्यात भिन्न भिन्न संस्कृती, वेशभूषा, चालीरिती, परंपरा आहेत एवढेच नाही, तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यामध्ये विविधता आहे. तरीही या सर्वांना सनातन धर्म म्हणजेच हिंदु धर्म हा पाया असल्याने सर्वजण गुण्यागोविंदाने राहू शकतात.
भारतातील गंगा नदी ही सर्वांत मोठी नदी आहे. ती अनेक राज्यांमधून प्रवाहित होते. तिच्या सहस्रो किलोमीटरच्या प्रवासात तिच्यात सांडपाण्यापासून ते कारख्यान्यांचे रसायनमिश्रीत पाणी एवढेच नाही, तर मुक्तीसाठी व्यक्तीचे मृतदेहही सोडले जातात. असे असूनही या नदीच्या पाण्याचे अनेक वेळा परीक्षण केले असता त्यामध्ये जीवजंतू आढळत नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गंगेत मानवी प्रदूषण होऊनही गंगानदीचे पावित्र्य मात्र अक्षुण्ण रहाते, हे विशेष !
भारताचा गौरवशाली नकाशा !

‘गुगल अर्थ’ या गुगलच्या पृथ्वीवरील विविध प्रदेश पहाण्याच्या दिलेल्या सुविधेद्वारे भारताचा नकाशा पाहिल्यावर आपल्याला अनेक दैवी गोष्टींचा बोध होतो. भारताच्या नकाशात डाव्या बाजूला म्हणजेच नकाशात पश्चिम दिशेला गुजरात राज्य आहे. या नकाशातील गुजरातला ‘गुगल अर्थ’द्वारे उलट बाजूने पाहिल्यास त्या ठिकाणी गरुडाच्या मस्तकाचा भाग दिसतो आणि तेथून उर्वरित भारताचा प्रदेश हा गरुडाच्या दोन्ही पंखांप्रमाणे दिसतो. या गरुडाच्या डोळ्यांच्या ठिकाणी दिसणारा बिंदू म्हणजेच जुनागढ (गिरनारचा प्रदेश) आहे. हा जुनागढचा प्रदेश भगवान श्रीकृष्णाने सिद्ध केला होता. त्याचा आकार गुगल अर्थद्वारे पाहिल्यास मोरपंखाप्रमाणे दिसतो. या गरुडाच्या डोक्यावर म्हणजे सहस्रारचक्राच्या ठिकाणी सोमनाथ तीर्थक्षेत्र येते. या ठिकाणीच बाणस्तंभ आहे. हा बाणस्तंभ दक्षिण ध्रुवाकडे वळला आहे. दक्षिणेकडे जातांना २४ सहस्र कि.मी.पर्यंत एकही बेट मध्ये नाही. हे भारताच्या भौगोलिक महाविज्ञानाचा पुरावाच नाही का ?
जगातील सर्वांत मोठा धार्मिक महोत्सव : कुंभमेळा !

जगातील सर्वांत मोठा धार्मिक महोत्सव म्हणजे कुंभमेळा ! या वेळी प्रयागराज येथील कुंभमेळ्याला ४० कोटींहून अधिक लोक येणार आहेत, तेही कुठल्याही निमंत्रणाविना ! जगात अन्य देशातील कुठल्याही अन्य धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात किंवा अन्य मोठा कार्यक्रमात काही कोटीही उपस्थिती नसते. यातून कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येऊ शकेल. एका अंदाजानुसार भारतात एकूण साधूंची संख्या ४० ते ५० लाख असू शकते. साधू म्हणजे येथे सांसारिक गोष्टींचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी आराधना करणारे आहेत. जगाच्या पाठीवर असा अन्य पंथीय एक देश तरी आहे का ? जेथे त्यांच्या पंथांच्या उपासनामार्गासाठी एवढ्या मोठ्या संख्येत सांसारिक जीवनाचा त्याग करून उपासनारत आहेत ! हे केवळ भारतातच आहे.

बाकी भारताचा विचार केला, तर भारतात बारा बलुतेदार पद्धत, पिढीजात मूर्तीकला, संगीतकला, चित्रकला इत्यादी कलांचे संगोपन करणारी घराणी आहेत. त्यामुळे या कला जिवंत आहेत आणि अत्युच्च पातळीवर अद्यापही कार्यरत आहेत. भारतीय गावे ही मोगल आणि ब्रिटीश आक्रमणांच्या पूर्वी संपन्नच होती; कारण ती स्वयंपूर्ण होती. गावातील सर्व आवश्यकता या गावातच पूर्ण केल्या जाण्याची व्यवस्था होती. गावाच्या रक्षणाचे आणि गावातील मोठ्या तंट्यांच्या निवारणाचे दायित्व तेवढे राजा किंवा राज्यव्यवस्था घेत असे. मुख्य म्हणजे याचे कारण गुरुकुल ही सुंदर आणि मानवाचे कल्याण करणारी व्यवस्था होती. व्यक्तीला केवळ शिक्षित नव्हे, तर सुसंस्कारित आणि नीतीवान, गुणवान बनवण्याची व्यवस्था गुरुकुलात होती. येथेच कर्तृत्वान राजे, महाराजे, चक्रवर्ती सम्राट निर्माण झाले; कारण सनातन धर्म हा या गुरुकुलांचा पाया म्हणजेच येथे धर्मशिक्षण आणि ऐहिक जीवनातील व्यवस्थांचे शिक्षण मिळत असे.
भारताविषयी कितीही सांगितले, तरी ते अल्पच आहे. भारत देश हा गौरवशाली आणि पुण्यभूमी म्हणून विश्वप्रसिद्ध आहे. अशा भारताला त्रिवार नमन !
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल (४.१.२०२५)