Alexander Dugin On Trump : डॉनल्ड ट्रम्प यांची हत्या होऊ शकते !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सल्लागार रासपुतिन यांचा दावा

पुतिन यांचे सल्लागार अलेक्झांडर डुगिन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

मॉस्को (रशिया) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताच रशियाला युक्रेनसमवेतचे युद्ध संपवण्याची चेतावणी दिली आहे. ‘जर रशियाने असे केले नाही, तर त्याच्यावर विविध निर्बंध लादण्यात येईल’, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांचे ‘रासपुतिन’ म्हणून प्रसिद्ध असलेले सल्लागार अलेक्झांडर डुगिन  यांनी म्हटले आहे की, जर डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ्. केनेडी यांच्या हत्येची माहिती सार्वजनिक केली, तर त्यांना देशाच्या लोकांकडून, ‘डीप स्टेट’कडून (सरकारवर दबाव आणणार्‍या छुप्या यंत्रणेकडून) त्यांची हत्या केली जाऊ शकते.

१. डुगिन यांनी पुढे असेही म्हटले की, जर पुतिन युद्ध थांबवण्यासाठी सिद्ध झाले नाहीत, तर ते स्वतःच्या हातांनी रशियाचा नाश करतील; कारण पुतिन यांनी तडजोड न करण्याचा निर्णय घेतल्याने रशिया मोठ्या संकटात सापडेल. या युद्धामुळे रशियाची अर्थव्यवस्थाही बुडत आहे आणि महागाई अजूनही एक मोठा धोका आहे. याखेरीज इतरही अनेक धोके आहेत.

२. युरोपमध्ये अमेरिकेच्या सैन्याचे कमांडर म्हणून काम केलेले निवृत्त जनरल बेन हॉजेस यांनी ‘द युक्रेनियन रिव्ह्यू’ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पुतिन यांचा देश रशिया लवकरच अनेक लहान देशांमध्ये विभागला जाऊ शकतो; कारण एक एकीकृत प्रजासत्ताक म्हणून त्याचे दिवस संपले आहेत. जर असे झाले, तर निर्वासितांची एक नवीन लाट येईल आणि संभाव्य आण्विक अराजकता निर्माण होईल. रशियाचे पतन सोव्हिएत युनियनच्या पतनासारखे अचानक असू शकते.