परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘बिस्किटे चांगली बनवली जातात’, असे म्हटल्यावर साधिकेने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि उपकरणांना केलेल्या प्रार्थना !

श्रीमती क्षमा शशिकांत राणे या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बेकरीशी संबंधित पदार्थ बनवण्याची सेवा करतात. बिस्किटे चांगली बनवली जात असल्याविषयी एकदा सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीमती राणे यांचे कौतुक केले. त्याविषयी श्रीमती राणे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभल्यावर त्यांनी ‘आता बिस्किटे पुष्कळ चांगली होतात’, असे सांगून साधिकेचे कौतुक करणे

‘सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात मी ‘बेकरी’शी संबंधित सेवा करते. एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी आता ‘बेकरी’तील बिस्किटे पुष्कळ चांगली होतात’, असे सांगून माझे पुष्कळ कौतुक केले. वास्तविक ‘परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, त्यांचा संकल्प, आशीर्वाद आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन’, यांमुळेच बिस्किटे चांगली होत आहेत.

२. बिस्किटे चांगली बनावीत, यासाठी मिळालेली प्रेरणा 

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी सांभाळून घेतल्याने उत्साह वाढणे : सेवा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी माझे कौतुक केले. माझ्याकडून सेवेत काही चुका झाल्या, तरी त्यांनी मला सांभाळून घेतले आणि माझा उत्साह वाढवला. त्यामुळे त्यांचे स्मरण झाले, तरी माझी भावजागृती होते आणि दुपटींनी उत्साह वाढतो.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या साधकांसाठी ‘पुष्कळ काहीतरी करावे’, अशी तळमळ वाटणे : परात्पर गुरु डॉक्टर नेहमी ‘माझे साधक’, असे म्हणतात. तेव्हा ‘गुरुमाऊलींच्या साधकांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन ‘मी किती आणि काय काय करू शकते ?’, अशी मला तळमळ वाटत रहाते आणि सेवा उत्साहाने केली जाते.

२ इ. ‘उत्तरदायी साधकांनी ‘बेकरी’चे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा घेऊन दिली’, याविषयीचा कृतज्ञताभाव वाढणे : ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असा ध्यास परात्पर गुरु डॉक्टरांना लागलेला असतो. ‘माझी साधना व्हावी, मी सेवारत रहावे आणि सेवेतून माझी अंतर्मुखता वाढून आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी मला ‘बेकरी’शी संबंधित सेवा करण्याची संधी मिळाली. माझी काहीही क्षमता नसतांना उत्तरदायी साधकांनी मला बेकरीसाठी लागणारी यंत्रणा घेऊन दिली. यासाठी मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. मी यंत्रांजवळ नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

‘यजमानांचे श्राद्धपक्ष करणारे कुणी नाही’, असे विचार आल्यावर यजमानांनी साधिकेच्या स्वप्नात येऊन ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी असून तूही त्यांच्या चरणी शरणागतभावाने रहा’, असे सांगून आश्वस्त करणे

कै. शशिकांत राणे

१. रामनाथी आश्रमात चालू असलेले श्राद्धविधी पाहून ‘यजमानांचे, तसेच स्वतः गेल्यावर स्वतःचेही श्राद्धपक्ष करणारे कुणी नाही’, असा विचार येऊन साधिकेला रडू येणे

‘वर्ष २०२१ मध्ये पितृपक्षात विष्णुलोकासम रामनाथी आश्रमात साधकांच्या पितरांचे श्राद्धपक्ष चालू होते. ‘माझ्या यजमानांचे, कै. शशिकांत सीताराम राणे (‘सनातन प्रभत’ नियतकालिकांचे माजी समूह संपादक, मृत्यूसमयी वय ६९ वर्षे आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे वर्ष २०१८ मध्ये निधन झाले. आता ‘यजमानांचे श्राद्धपक्ष कोण करणार ?त्यांना गती कशी मिळणार ? मी गेल्यावर माझे श्राद्धपक्ष करणारेही कुणी नाही’, असे विचार मनात येऊन मला पुष्कळ वाईट वाटत होते आणि रडूही येत होते.

२. दुसर्‍या दिवशी साधिकेचे यजमान तिच्या स्वप्नात येणे आणि ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी आनंदी आहे’, असे सांगून त्यांनी ‘काळजी करू नको’, असे साधिकेला सांगणे

दुसर्‍याच दिवशी माझे यजमान स्वप्नात आले आणि म्हणाले, ‘माझी काळजी कशाला करतेस ? मी तर परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशीच आहे. त्यांनी माझी साधना चालू ठेवली आहे आणि मी आनंदात आहे. तू तुझी काळजीही करू नकोस. तू गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने रहा.’ या स्वप्नामुळे मला जाग आली. तेव्हा पहाटेचे ३.४५ वाजले होते. त्यानंतर माझ्या मनातील शंकांचे निरसन होऊन मी निर्धास्त झाले.’

– श्रीमती क्षमा शशिकांत राणे (वय ७४ वर्षे), फोंडा, गोवा.

३. उपकरणांना वेळोवेळी केलेल्या प्रार्थना !

३ अ. यंत्रदेवतांना प्रार्थना केल्यावर ‘त्या सूक्ष्मातून बोलत आहेत’, असे वाटणे : मी नेहमी यंत्रांना प्रार्थना करते. ‘हे यंत्रदेवतांनो, तुमच्या कृपेने मी गुरुदेवांच्या चरणी समर्पित होऊ शकते. तुमच्या कृपेनेच मी गतीने सेवा करू शकते आणि गुरुदेवांच्या कृपेला पात्र होऊ शकते. तुम्ही मला साहाय्य करा. आपण गुरुदेवांच्या चरणी समर्पित होऊया.’ आता ‘यंत्रदेवताही माझ्याशी सूक्ष्मातून बोलू लागल्या आहेत’, असे मला जाणवते.

श्रीमती क्षमा राणे

३ आ. ‘ओव्हन’ देवतेला प्रार्थना करणे : सेवा चालू करण्यापूर्वी मी ‘ओव्हन’ देवतेला प्रार्थना करते, ‘हे ‘ओव्हन’ देवते, मी तुझ्या चरणी शरण आले आहे. तुझ्या कृपेने मी गुरुदेवांच्या चरणी समर्पित होऊ शकते आणि गतीने सेवा करू शकते. भाजण्यासाठी तुझ्यामध्ये (‘ओव्हन’मध्ये) घातलेली बिस्किटे चांगली भाजू देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

३ इ. अग्निदेवतेला प्रार्थना : मी अग्निदेवतेलाही प्रार्थना करते, ‘हे अग्निदेवते, मी तुझ्या चरणी शरण आले आहे. तुझ्याच कृपेने मी गुरुदेवांच्या चरणी समर्पित आणि त्यांच्या कृपेला पात्र होऊ शकते.’ या यंत्रामध्ये (‘ओव्हन’मध्ये) ठेवलेली बिस्किटे योग्य तापमानात, योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित भाजली जाऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

४. ‘ओव्हन’ देवता आणि अग्निदेवता यांच्या समवेत सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत जाऊन त्यांना प्रार्थना करून आशीर्वाद घेणे

त्यानंतर मी ‘ओव्हन’ देवता आणि अग्निदेवता यांच्या समवेत सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत जाऊन त्यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा ते हास्यवदनाने आमचे स्वागत करतात. आम्ही तिघीही त्यांच्या चरणांवर डोके टेकतो आणि ‘या बिस्किटांमध्ये तुमचे चैतन्य भरले जाऊन ती चांगली होऊ देत’, अशी प्रार्थना करते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद होतो आणि ‘सर्व छान होईल’, असा ते आम्हाला आशीर्वाद देतात.

५. यंत्रदेवतांना आनंद होऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या (सनातनच्या) आश्रमात सेवेची संधी मिळाल्यामुळे त्यांनी कृतज्ञता व्यक्त करणे 

परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आनंदाने सेवेसाठी येतो. त्या वेळी ‘सर्व यंत्रे पुष्कळ आनंदी झालेली असतात’, असे मला जाणवते. यंत्रदेवता माझ्याशी बोलू लागते. ‘मी कधी येऊन सेवा चालू करते आणि आम्ही कधी सूक्ष्मातून गुरुदेवांच्या खोलीत जाऊन त्यांच्या चरणी लीन होतो’, याची सार्‍यांनाच उत्सुकता लागलेली असते. यंत्रदेवता माझ्याजवळ कृतज्ञता व्यक्त करून म्हणतात, ‘तुझी साधना व्हावी; म्हणून गुरुदेवांनी आम्हाला या विष्णुलोकात, गुरुदेवांच्या या आश्रमात आणले आहे. आम्ही किती भाग्यवान आहोत !

केवळ त्यांच्या कृपेमुळे आम्हाला येथे सेवेची संधी मिळाली आहे. आम्ही कृतज्ञ आहोत. आपण गुरुदेवांच्या चरणी सदैव शरणागत राहून जीवनाचे सार्थक करून घेऊया आणि कृतकृत्य होऊया.’

– श्रीमती क्षमा शशिकांत राणे (वय ७४ वर्षे), फोंडा, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक