
प्रयागराज, १८ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभपर्वात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे विद्यार्थी येथील विविध आखाडे आणि वेगवेगळे मंडप यांमध्ये जाऊन रूद्रपाठ, स्तोत्रपठण, पूजा, संस्कृत गीत गायन, वैदिक मंत्रपठण करून आणि सामाजिक माध्यमांचा वापर करून संस्कृत भाषेचा प्रचार अन् प्रसार करत आहेत, अशी माहिती जयपूर येथील प्रा. डॉ. देवकरण शर्मा यांनी दिली. ‘संस्कृत भाषा प्रसार अभियाना’द्वारे संस्कृत भाषेचा प्रसार करण्यात येत आहे.
डॉ. शर्मा पुढे म्हणाले की,
१. कुलपती प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडे यांच्या मार्गदर्शनानुसार एकूण १३ शाखा असून याद्वारे एकूण २७ संस्कृत महाविद्यालये आणि १०० हून अधिक संस्कृत भाषा शिक्षण केंद्रे चालवली जातात. ही केंद्रे आय.आय.टी, आय.आय.एम्., वैद्यकीय महाविद्यालये यांमध्ये चालवली जातात.
२. संस्कृत विश्वविद्यालयाच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना कुंभपर्वामध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २ दिवस सहभागी होण्यासाठी ५० विद्यार्थ्यांना गटागटांमध्ये विभागून आणण्याचे नियोजन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयांच्या वतीने विद्यालयाचे नाव असलेले टी-शर्ट घालण्यात देण्यात आले आहेत.
३. संस्कृत भाषेचा प्रसार आणि प्रभाव या आधुनिक युगातही वाढत असून अनेक विद्वान, बुद्धीमान, तसेच तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रातील मंडळी याकडे आकर्षित होत आहेत, असे जागतिक चित्र आहे.