राज्‍यातील ४४ पैकी ३० शहरांमध्‍ये सार्वजनिक परिवहन सेवा अनुपलब्‍ध !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्‍यातील ४४ पैकी ३० शहरांमध्‍ये महापालिका किंवा नगरपालिका यांची सार्वजनिक परिवहन सेवाच उपलब्‍ध नाही. १४ शहरांमध्‍ये परिवहन सेवा उपलब्‍ध असली, तरी त्‍यात बसगाड्यांचा तुटवडा आहे. या पार्श्‍वभूमीवर २४ सहस्र बसगाड्यांची आवश्‍यकता आहे. खासगी वाहनांची संख्‍या न्‍यून करून पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्‍यासाठी काम करणार्‍या ‘इन्‍स्‍टिट्यूट ऑफ ट्रान्‍स्‍पोर्टेशन अँड डेव्‍हल्‍पमेंट पॉलिसी’ने (आयटीडीपी) राज्‍यातील शहरांतील परिवहन सेवेचा डिसेंबर २०२४ मध्‍ये अभ्‍यास केला. केंद्र सरकारच्‍या गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाच्‍या सार्वजनिक वाहतूक सेवेतील निकषानुसार ‘१ लाख प्रवाशांमागे ६० बस’ असे प्रमाण आहे.

या अहवालानुसार ५.४ कोटी शहरी भागांतील नागरिकांच्‍या वाहतूक गरजा पूर्ण करण्‍यासाठी राज्‍यातील ४४ शहरांमध्‍ये किमान २८ सहस्र ८०० बसगाड्यांची आवश्‍यकता आहे. सध्‍या राज्‍यात शहरी भागांत केवळ ८ सहस्र ७०० इतक्‍याच बस आहेत. त्‍यातही ३ सहस्र ५०० बस त्‍यांचे आयुर्मान पूर्ण झाल्‍याने सेवेतून बाद होणार आहेत.

संपादकीय भूमिका 

२४ सहस्र बसगाड्यांची आवश्‍यकता परिवहन विभागाने यात तातडीने लक्ष घालून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्‍यासाठी प्रयत्न करावेत !