रत्नागिरीमध्ये वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी कह्यात घेतले

आतंकवाद विरोधी पथकाची कारवाई

रत्नागिरी – रत्नागिरी शहर पोलीस आणि आतंकवाद विरोधी पथक (ए.टी.एस्.)  यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील साळवी बसथांबा परिसरात केलेल्या कारवाईत एका बांगलादेशी महिलेला कह्यात घेतले. काही दिवसांपूर्वी शिरगावमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला स्थानिक रहिवासी दाखला दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर पुन्हा हे प्रकरण उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

साळवी बसथांबा परिसरात बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती आंतकवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यामुळे पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार ही बांगलादेशी महिला गेली ४ ते ५ वर्षे रत्नागिरीत वास्तव्य करत असून ती घरकाम करत असे. ती विवाहित असून पतीचे दुकान आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले. (रत्नागिरीमध्ये नुकतेच एका बांगलादेशी नागरिकाला वास्तव्याचा दाखला देण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता पुन्हा बांगलादेशी महिला सापडल्याने स्थानिक पातळीवर त्यांना कोणीतरी साहाय्य करत आहे का ? याचा पोलिसांनी शोध घ्यावा. – संपादक)