सातारा, १५ जानेवारी (वार्ता.) – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माण पंचायत समितीमधील शाखा अभियंत्याला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. बांधकाम ठेकेदार असलेल्या तक्रारदारांनी माण तालुक्यातील उकिंडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोलीचे बांधकाम केले आहे. त्याचे देयक संमतीसाठी पाठवायचे होते. या कामासाठी दहिवडी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या भरत संभाजी जाधव यांनी तक्रारदाराकडे २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी १५ सहस्र रुपये लाचेची रक्कम खासगी व्यक्ती बुवासाहेब जगदाळे यांच्या वतीने भरत जाधव यांनी दहिवडी पंचायत समिती बांधकाम विभाग कार्यालयात स्वीकारली. या वेळी दोघांनाही रंगेहात पकडले. त्यामुळे भरत जाधव आणि बुवासाहेब जगदाळे यांच्या विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :तळागाळापर्यंत पोचलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी भ्रष्टाचार करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे ! |