अपघातशून्य सेवा देण्याचा संकल्प करा ! – शिवराज जाधव, विभाग नियंत्रक

राज्य परिवहन महामंडळामध्ये ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना-जानेवारी २०२५’ प्रारंभ !

‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना प्रारंभ’ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना शिवराज जाधव आणि अन्य अधिकारी

कोल्हापूर, १२ जानेवारी (वार्ता.) – प्रतिदिन एस्.टी.तून लाखो प्रवासी वाहतूक करतात. त्यांचे दायित्व वाहक-चालक यांच्यावर असते. त्यामुळे प्रवाशांना सेवा देतांना अपघातशून्य सेवा देण्याचा संकल्प करा, असे आवाहन विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी केले. १ ते ३१ जानेवारी या कालावधीत राज्य परिवहन महामंडळामध्ये ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना-जानेवारी २०२५’ राबवण्यात येत आहे. याचा प्रारंभ कोल्हापूर आगारात ११ जानेवारीला करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी वाहकाने वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर करू नये, वाहन चालवतांना वेगमर्यादेचे उल्लंघन करू नये, सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. या वेळी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांच्यासह चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन स्थानकप्रमुख मल्लेश विभुते, साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी, साहाय्यक वाहतूक निरीक्षक दीपक घारगे यांनी केले.

या कार्यक्रमात विनाअपघात सेवा देणार्‍या चालक, तसेच अन्य एस्.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. वारणा विद्यालयातील विद्यार्थी कु. सर्वेश संदीप पाटील याचा त्याच्या विशेष आवाजात हूबेहुब एस्.टी.च्या उद्घोषणेप्रमाणे प्रचार करत असल्याविषयी विशेष सत्कार करण्यात आला.

संभाजीनगर आगारात ‘रस्ते सुरक्षा अभियाना’चे उद्घाटन !

संभाजीनगर येथील आगारात कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर

‘एस्.टी.’च्या संभाजीनगर आगारात शहर वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रस्ते सुरक्षा अभियाना’चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आगार व्यवस्थापक स्वप्नील पाटील, आगारप्रमुख सुरेश शिंगाडे, कार्यशाळा अधीक्षक राहुल पाटील यांसह कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते.’