सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राण्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न ! – पालकमंत्री नितेश राणे

मोर्ले येथे हत्तीच्या आक्रमणात मृत्यू झालेल्या कै. लक्ष्मण गवस यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट

दोडामार्ग – तालुक्यातील मोर्ले गावात हत्तीने केलेल्या आक्रमणात मृत्यू झालेले कै. लक्ष्मण गवस यांच्या कुटुंबियांची जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी १४ एप्रिल या दिवशी भेट घेऊन सांत्वन केले. ‘कै. गवस यांच्या मुलाला सरकारी नोकरीत घेण्यासह शासनाकडून अधिकाधिक हानीभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. यापुढे जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या आक्रमणात जीवित हानी होऊ नये, यासाठी वन्य प्राण्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न आहे’, असे पालकमंत्री राणे यांनी या वेळी सांगितले.

‘हत्तींच्या समस्येविषयी मी गंभीर असून या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. टप्प्याटप्प्याने सर्वच हत्तींना पकडण्यात येईल. याविषयी वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभाग यांच्याशी चर्चा केली असून ‘हत्ती पकडा’ मोहीम लवकरच चालू केली जाईल’, असे मंत्री राणे म्हणाले त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांच्यासह मोर्ले, सोनावल, तेरवण मेढे, पाळये, घोटगे आदी गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.