विश्वशांती, जनकल्याण आणि पर्यावरणरक्षण यांसाठी भाविकांकडून पूजन !

जळगाव – मुक्ताईनगर येथील भुसावळ रस्त्यावरील शासकीय धान्य गोदामासमोरील गायत्री मंदिरात गुढीपाडवा ते रामनवमी या काळात विश्वशांती, जनकल्याण आणि पर्यावरणरक्षण यांसाठी २४ सहस्र मंत्रजपाचे अनुष्ठान करण्यात आले. १२ एप्रिल या दिवशी पंचकुंडी यज्ञाने अनुष्ठानाची समाप्ती शांतीकुंज हरिद्वार येथील यज्ञाचार्य रामदास रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गायत्री मंदिरात सकाळी ६ वाजता गुरुपूजन आणि गायत्री पूजन करण्यात आले, तसेच ध्यान आणि जपही करण्यात आला. सकाळी ७ वाजता आरती झाली. १० वाजता यज्ञाला आरंभ झाला. प्रारंभी गुरुपूजन, गणेशपूजन आणि देवपूजन मंत्रोपचाराने करण्यात आले. १० ते ११ या कालावधीत गायत्री मंत्र आणि महामृत्यूंजय मंत्र यांनी आहुती देण्यात आली. पंचकुंडी यज्ञाने जप अनुष्ठानाची समाप्ती करण्यात आली.
यावेळी जे.ई. स्कूलचे माजी प्राचार्य आर्.पी. पाटील यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गायत्री परिवाराचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष पिंपरीकर गुरुजी, भूपेंद्र चौधरी, पद्माताई महाले आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.