शिवसेना (उबाठा) पक्षाचे मालवण उपशहरप्रमुख सन्मेश परब यांची मागणी
मालवण – शहरातील दांडी येथील श्री दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीस अनुमती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत ही प्रवासी होडी वाहतूक चालू होणार आहे; मात्र हा प्रवासी होडी वाहतुकीचा व्यवसाय गावाबाहेरील व्यक्तींना न देता तो स्थानिकांच्या आणि मासेमारांच्या हातातच रहावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपशहरप्रमुख सन्मेश परब यांनी केली आहे.
बंद असलेली ही प्रवासी होडी वाहतूक सेवा चालू व्हावी, यासाठी मेघनाद धुरी, रूपेश प्रभु, अन्वय प्रभु यांच्यासह अन्य स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून दांडेश्वर ते सिंधुदुर्ग किल्ला अशा प्रवासी होडी वाहतुकीस शासनाने मान्यता दिली आहे. याठिकाणी स्थानिकांऐवजी बाहेरील व्यक्तींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रवासी होडी वाहतुकीचा लाभ स्थानिक बेरोजगारांना व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे परब यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.