डोळ्यांचे पारणे फेडणारा श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव !

श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव

कोल्हापूर – जोतिबा देवाची यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी चैत्र मासात श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव साजरा केला जातो. हा रथोत्सव ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात, नेत्रदीपक रोषणाईमध्ये ‘उदं गं अंबे उदं’, चा जयघोष करत प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. १३ एप्रिलच्या रात्री ९.३० वाजता शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’चे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रथाचे पूजन करण्यात आले. यानंतर मानकर्‍यांच्या हस्ते तोफेची सलामी देण्यात आली. यानंतर रथ नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून मार्गस्थ झाला.

श्री महालक्ष्मीदेवीच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक

फुलांनी सजवलेल्या सागवानी रथातून श्री महालक्ष्मीदेवीच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. हा सोहळा पहाण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक आले होते. रथोत्सवाच्या मार्गावर अत्यंत आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच रस्त्यांवर फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या होत्या. महाद्वार रस्ता, गुजरी कॉर्नर, भाऊसिंगजी रस्ता, भवानी मंडप, मिरजकर तिकटीमार्गे श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली.