१५ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करतांना शेतकर्‍यांशी संवाद साधा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

कोल्हापूर – जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबवण्यात येणार्‍या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून शेतकर्‍यांशी संवाद साधा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या संदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी यांनी या सूचना दिल्या.

अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

या प्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही रहाणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यामध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांचे साहाय्य घ्यावे. कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल.

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणीवापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे.’’