बांगलादेशी अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने पुण्यातील वेश्यालयात विकले !

पीडितेने स्वत:ची सुटका करत तक्रार प्रविष्ट केली

पुणे – बांगलादेशातील अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने नोकरीच्या आमिषाने भारतात आणले. तिची ३ लाख रुपयांमध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील एका कोठेवालीकडे विक्री केली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ५ महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करून एका महिलेला अटक केली आहे. (यातून बांगलादेशींना या ना त्या मार्गाने भारतात घुसवण्याचे मोठे जाळेच आहे, हे यातून लक्षात येते. हे जाळे नष्ट करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता ! – संपादक) पीडितेवर ५ महिन्यांपासून अत्याचार होत होता.

१६ वर्षे २ महिने वय असलेली पीडित मुलगी मूळची बांगलादेशाची रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी अनधिकृतरित्या भारतामध्ये आणल्यानंतर पीडितेला ‘तू बांगलादेशी आहेस. तुझ्यावर पोलीस कारवाई करतील’, अशी भीती घालून तिच्याकडून बळजोरीने वेश्याव्यवसाय करवून घेत. पीडित मुलीने ७ एप्रिलला बुधवार पेठेतून पळ काढला. ती हडपसर भागामध्ये आली. त्यानंतर तिने हडपसर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तक्रार प्रविष्ट केली आहे.