सहा मासांत पर्वरी येथे आंबेडकर भवनाची पायाभरणी करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – भाजप सरकार येत्या ६ मासांत पर्वरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची पायाभरणी करणार आहे. २ सहस्र १४० चौ.मी. भूमीत हे भवन बांधले जाणार आहे आणि यासाठी १० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा सरकारचे समाजकल्याण खाते आणि गोवा राज्य अनुसूचित जाती अन् जमाती, इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल या दिवशी पणजी येथील आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून पर्वरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावे, अशी मागणी मागासवर्गीय समाजातील प्रतिनिधी सरकारकडे करत होते. सरकार अत्याधुनिक असे आंबेडकर भवन उभारणार आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या रहाण्याचीही सोय असणार आहे. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, हे बाबासाहेबांचे ध्येय होते आणि भाजप सरकार ते पुढे नेत आहे. म्हणून पुढील ६ मासांत पायाभरणी करून लवकरच हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.’’ या कार्यक्रमात मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी आणि अन्य यांना डॉ. आंबेडकर सन्मान मूर्ती पुरस्कार देण्यात आला.