३० सहस्र रुपयांसाठी अभिनेत्याच्या घरी चोरीचा प्रयत्न !
मुंबई – अभिनेते सैफ अली खान यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून त्यांच्यावर आक्रमण करणार्या महंमद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड मिळवण्यासाठी ३० सहस्र रुपये चोरायचे होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. तो केवळ भारतीय पारपत्र मिळवण्याच्या उद्देशाने भारतात आला होता.
अभिनेते सलमान खान यांना घरात घुसून मारण्याची धमकी !
मुंबई – अभिनेते सलमान खान यांना घरात घुसून मारू, तसेच ‘सलमान खान याची गाडी बाँबने उडवून देऊ’, असा धमकीचा संदेश वरळीमधील वाहतूक पोलीस विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. धमकीनंतर सलमान खान यांच्या घराच्या बाहेर पोलीस संरक्षण वाढवण्यात आले आहे. यापूर्वीही सलमान खान यांना धमकी देण्यात आल्या आहेत.
अमरावती येथे ‘डिजिटल अरेस्ट’ !
अमरावती – सायबर भामट्याने येथील ७९ वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकार्याला भ्रमणभाष करून मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हे नोंदवल्याचे सांगितले. त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे भासवले. त्यांची पत्नी आणि मुलगा यांना जिवे मारण्याची धमकी देऊन ३१.५० लाख रुपये लुबाडण्यात आले. वृद्धाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
संपादकीय भूमिका : सायबर गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
यावर्षीही राज्यशासनाकडून पाणी विकत घेणार !
मुंबई – मुंबईमध्ये पाणीटंचाई होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने राज्यशासनाकडे राखीव पाणीसाठ्यातील पाण्याची मागणी केली आहे. या मागणीवरून राज्यशासन मुंबईसाठी उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ सहस्र दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ सहस्र दशलक्ष लिटर राखीव पाणी देणार आहे. मागील वर्षीही मुंबई महानगरपालिकेने पैसे देऊन राज्यशासनाकडून राखीव पाणी विकत घेतले होते.
पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची मागणी