अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई
पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) लक्ष्मणपुरी विभागीय कार्यालयाने देहलीस्थित बांधकाम व्यावसायिक समूहाच्या विरोधात चालू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी १० एप्रिल या दिवशी देहली, नोयडा आणि गोवा येथे मिळून एकूण ९ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. ‘आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. संबंधित आस्थापन आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक सतिंदर सिंह भसीन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली.
अंमलबजावणी संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार ‘भसीन इन्फोटेक अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.’ या आस्थापनाने ‘ग्रॅन्ड व्हेनेझिया कमर्शियल कॉम्प्लेक्स’ या नावाने एक ‘रिअल इस्टेट’ प्रकल्प चालू केला होता. या प्रकल्पासाठी आस्थापनाने आकर्षक विज्ञापने देऊन खोट्या आश्वासनांच्या आधारे अनेक गुंतवणूकदारांना फसवले. गुंतवणूकदारांना वेळेत मालमत्ता सुपुर्द करण्यास आस्थापन अपयशी ठरले. आस्थापनाने गुंतवणूकदारांची रक्कम अन्यत्र वळवली, असा आरोप आहे. संचालनालयाने धाडीच्या वेळी महत्त्वाचे दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आक्षेपार्ह माहिती कह्यात घेतली आली. तसेच ३० लाख रोख रक्कम, बँक लॉकरच्या चाव्या आणि संशयित बँक खात्यांचे व्यवहार गोठवण्यात आले आहेत.