अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांना ‘आग धोका भत्ता’ देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील अग्नीशमन दलाचे कार्य कौतुकास्पद आहे. दलाचे सैनिक जिवाची पर्वा न करता आपत्कालीन स्थितीत लोकांबरोबरच मालमत्ता वाचवण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन आणि त्यांच्या मागणीचा विचार करून अग्नीशमन दलातील सैनिकांना यापुढे चालू आर्थिक वर्षापासून ‘आग धोका भत्ता’ (फायर रिस्क अलाऊन्स) देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.

‘राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिना’च्या निमित्ताने १४ एप्रिल या दिवशी सांत इनेज येथील अग्नीशमन दलाच्या मुख्यालयात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलु, अग्नीशमन दलाचे संचालक नितीन रायकर  आणि इतर अधिकारी यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘अग्नीशमन दलाने गतवर्षी तत्परता आणि कौशल्य यांच्या बळावर विविध घटनांमध्ये ३९८ जणांचे जीव वाचवले आहेत, तसेच ४४ कोटी रुपयांची मालमत्ताही वाचवली आहे. इमारत बांधकाम किंवा उद्योग यांना अग्नीशमन दलाकडून ‘अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे; मात्र काहींना यामुळे अग्नीशमन दल सतावणूक करत असल्यासारखे वाटते. वादळग्रस्तांसाठी ११ निवारा केंद्रे असलेले गोवा राज्य हे देशातील अशी सुविधा पुरवणारे पहिले राज्य ठरलेले आहे.’’