हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचा संयुक्त उपक्रम

पुणे, १४ एप्रिल (वार्ता.) – प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागृती व्हावी, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुणे येथे मंचर, वडगाव काशिंबे, पिंपळगाव खडकी, भुकूम खाटपेवाडी, सदाशिव पेठ, सातारा रस्ता, आळंदेवाडी, मंचर गोकर्णेश्वर मंदिर, शनिवारवाडा, सिंहगड रस्ता, आंबेगाव, तळेगाव दाभाडे, सोरतापवाडी, हडपसर; शेवाळवाडी आदी एकूण ११६ ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. काही ठिकाणी मारुति मंदिरांत साकडे घालण्यात आले. या उपक्रमांना विविध संघटनांचे पदाधिकारी, मंदिरांचे विश्वस्त, धर्मप्रेमी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ ६ सहस्र ६०० हून अधिक जणांनी घेतला.
हनुमान जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये मंदिर स्वच्छता, फलकप्रसिद्धी, सामूहिक नामजप आणि मारुतिस्तोत्र पठण, प्रवचन, तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरांत ग्रंथ, सात्त्विक उत्पादनांचे कक्ष, फ्लेक्स प्रदर्शन लावणे असे विविध उपक्रम राबवण्यात आले. मारुति मंदिरांत लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या कक्षाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विशेष
१. महाकालिकादेवी मंदिर येथे सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते कसबा पेठ शौर्य शिबिराच्या मुलांसोबत गदापूजन झाले.

२. पर्वती येथील नगरसेविका श्रीमती स्मिता वस्ते यांनी सहकारनगर प्रेमळ मारुति मंदिर या ठिकाणी गदापूजन केले.
३. धनकवडीचे नगरसेवक श्री. बाळाभाऊ धनकवडे यांच्या हस्ते जयनाथ तालीम, धनकवडी या ठिकाणी गदापूजन झाले.
४. भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्येश्वर मारुति मंदिर येथे गदापूजन करण्यात आले. या वेळी मारुतिस्तोत्र पठण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञाही घेण्यात आली. या वेळी खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, या गदापूजनाच्या माध्यमातून तुम्ही हिंदु राष्ट्राच्या विचार सर्वांच्या मनावर दृढ करत आहात, हे अतिशय स्तुत्य आहे.

वैशिष्ट्यपूर्ण
१. सदाशिव पेठ, पुणे येथे वस्ताद महेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक वस्ताद प्रकाश मोरे, ‘उप महाराष्ट्र केसरी’ दिलीप आण्णा गायकवाड यांच्या उपस्थितीत २२० वर्षे जुन्या तालीममध्ये गदापूजन झाले. गदांची आधीच व्यवस्थित मांडणी करून घेतली होती. एकाग्रतेने विषय समजून हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतली.
२. सिंहगड रस्ता येथील शिवकाशीनर्मदेश्वर मंदिर येथे बजरंग दल, नर्हे प्रभागाचे प्रखंडप्रमुख श्री. निकम यांच्या हस्ते गदापूजन झाले. या वेळी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे सदस्यही उपस्थित होते.

३. सोरतापवाडी, हडपसर येथे मंदिराचे पुजारी आणि ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे उपस्थित होते.

४. केडगाव येथील हिंदुत्वनिष्ठ, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’चे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर आणि त्यांचे सहकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन वीर सावरकर ग्रंथालय, केडगाव येथे गदापूजन केले.


५. सदाशिव पेठेतील भिकारदास मारुति मंदिर येथे येणारे सर्वजण गदेला नमस्कार करून नंतरच पुढे जात होते. एक जिज्ञासूने पूजलेली गदा त्यांच्या पाठीवरून फिरवायला सांगितली.
६. काळेवाडी येथील ‘अखंड हरिनाम सप्ताहा’च्या कीर्तनामध्ये ह.भ.प. विशाल इंगळे महाराज यांनी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थांनी गदापूजन केले. या वेळी ह.भ.प. विशाल इंगळे महाराज यांनी, ‘हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून गावात गदापूजन केले जाते आहे, हे कौतुकास्पद आहे. गदेचे पूजन करून हनुमंताप्रमाणे आपण सर्वांनी भगवद्भक्ती करूया’, अशी प्रार्थना केली.
७. वनाज परिवार शिव मंदिर, कोथरूड येथे मंदिर विश्वस्तांनी समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला आणि प्रत्येक वर्षी गदापूजन करत आहात, हे पुष्कळ चांगले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि उपक्रमाचे कौतुक केले.
मंदिर विश्वस्तांच्या पत्नींना जेव्हा समितीच्या स्वसंरक्षण उपक्रमाविषयी समजले, तेव्हा त्यांनी ‘मंदिराच्या जवळील भागात मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करा’, असे सांगितले.