ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा विचार ! – अजित पवार

रयत शिक्षण संस्थेच्या नियोजन समिती बैठक

सातारा, १४ एप्रिल (वार्ता.) – ‘रयत शिक्षण संस्थे’ने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात शिक्षणाची गंगा पोचवली आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान कसे उपलब्ध करून देता येईल ? याविषयी विचार चालू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे नियोजन समिती सदस्य अजित पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, अभिमत विद्यापिठे आणि त्यांचे विस्तारीकरण अन् सक्षमीकरण यांविषयी नियोजन बैठकीमध्ये सखोल आणि धोरणात्मक चर्चा झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग आणि कौशल्य विकास याविषयी विकसित करण्याविषयी सखोल चर्चा झाली. हे तंत्रज्ञान टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना कसे उपलब्ध करून देता येईल ? याविषयी निर्णय घेण्यात येईल.