मुंबई – केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून घोषित केलेल्या नवीन नियमावलीच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून ‘मुंबई वॉटर टँकर असोसिएशन’ने संप घोषित केला होता. संप मागे घेण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांनी संपाविषयी तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या समवेत बैठक घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार १४ एप्रिल या दिवशी असोसिएशनच्या पदाधिकार्यांची भूषण गगराणी यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला.
असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून घोषित करण्यात येत असलेली नियमावली शिथिल करण्याविषयी भूषण गगराणी यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. संपाच्या काळात, तसेच त्यापूर्वी विहिर आणि कूपनलिका धारक यांना मुंबई महानगरपालिकेकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसीही प्रशासन मागे घेणार असल्याचे भूषण गगराणी यांनी आश्वासन दिल्याची माहितीही असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली.