बीड जिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप !

बीड – जिल्हा रुग्णालयात प्रसूतीच्या वेळी महिलेचा मृत्यू झाला आहे. सौ. छाया गणेश पांचाळ असे मृत महिलेचे नाव आहे. आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशांची मागणी केल्यानंतर महिला कर्मचार्‍यांना २ सहस्र रुपये दिले; मात्र पैसे देऊनही आमच्या रुग्णावर व्यवस्थित उपचार केले नाहीत, असा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.

महिलेचे पती गणेश पांचाळ म्हणाले की, माझ्या पत्नीला ११ एप्रिल या दिवशी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती केले होते; मात्र २ दिवसांनी माझ्या पत्नीवर उपचार चालू झाले. माझ्या पत्नीची सामान्य प्रसूती झाली. या वेळी अतीरक्तस्राव झाल्याची माहिती आधुनिक वैद्यांनी आम्हाला दिली नाही. बर्‍याच वेळानंतर त्यांनी आम्हाला रक्ताची पिशवी आणायला सांगितली. तेथील महिला कर्मचार्‍याला उपचारांविषयी सांगितल्यावर ‘आम्ही येथून निघून जातो, तुम्हीच तुमच्या रुग्णावर उपचार करा’, असे उद्धट उत्तर दिले. या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ गेला. त्यामुळे सौ. छाया पांचाळ यांचा मृत्यू झाला.