वास्को येथील घटना
वास्को, १४ एप्रिल (वार्ता.) – काठीला ‘च्युईंगम’ लावून एका मंदिरातील दानपेटीतील पैसे काढणार्या ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले आहे. पोलिसांनी त्यांच्या पालकांनाही योग्य समज देऊन त्यांच्याकडूनही पुन्हा चोरीचा प्रकार केला जाणार नाही, अशी हमी घेण्यात आली आहे. पालकांनी पाल्यांकडे योग्य लक्ष देण्याची आवश्यकता सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी व्यक्त केली आहे.
वास्को परिसरातील एका मंदिरातील दानपेटीतील पैसे कुणीतरी काढत असल्याचे संबंधित मंदिराच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर पाळत ठेवण्यात आली असता त्यांना ३ अल्पवयीन मुले काठीला ‘च्युईंगम’ लावून दानपेटीतील पैसे काढत असल्याचे आढळून आले. मुलांना कह्यात घेतल्यानंतर त्यांनी चूक स्वीकारली आहे. मुलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मुलांच्या पालकांना आणि सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांना बोलावून घेतले. या वेळी एका पालकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी संबंधित पालकाला असा प्रकार पुन्हा घडल्यास पुढील संभाव्य कारवाईची कल्पना दिली. या वेळी मुलांचे समुपदेशन करण्यात आले.