बरेली (उत्तरप्रदेश) – येथे काही दिवसांपूर्वी अनेक वर्षे बंद असणारे हिंदु मंदिर सापडले होते. या मंदिरावर येथे चौकीदार म्हणून नियुक्त केलेल्या वाजिद अली याने नियंत्रण मिळवले होते. त्याने मंदिरात येणार्या भाविकांना रोखले आणि मूर्ती टाकून दिल्या होत्या. गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून त्याने हे मंदिर बळकावले होते. हिंदु संघटनांनी आता ते उघड केल्यानंतर तेथे फडकणारा इस्लामी ध्वज काढून भगवा ध्वज लावला आहे. तसेच प्रशासनाने मंदिर बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करून अली याला मंदिर आणि घर रिकामे करण्याची नोटीस दिली आहे.
स्थानिक राकेश सिंह यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांनी महाराणी गंगेचे मंदिर याठिकाणी बांधले होते. त्यानंतर या मंदिरात अनेक देवतांच्या मूर्ती विधीनुसार बसवण्यात आल्या. अल्पावधीतच हे मंदिर आजूबाजूच्या हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र बनले होते. येथे नियमित पूजा होऊ लागली; मात्र सुमारे ५० वर्षांपूर्वी या मंदिरात बांधलेली खोली सहकारी संस्थेला भाड्याने देण्यात आली होती. या संस्थेच्या लोकांनी वाजिद अली या चौकीदाराची येथे देखभालीसाठी नेमणूक केली. त्याने येथे स्थापित केलेल्या मूर्ती हळूहळू गायब करत संपूर्ण मंदिराचा हळूहळू नियंत्रण मिळवले.