नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – ज्यांना मंत्रीपद दिले त्यांच्यात क्षमता आहे आणि ज्यांना दिले नाही त्यांच्यात क्षमता नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आमच्याकडे आमदारांची संख्या अधिक आहे. काही वेळा काही लोकांना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. जे आमदार आता पहिल्या टप्प्यात मंत्री बनले नाहीत, ते पक्षाचे आणि संघटनेचे काम करतील. त्यांना दुसर्या टप्प्यात संधी देऊन पहिल्या टप्प्यातील आमदारांना तेव्हा पक्षाचे काम करायला सांगू. ही नेहमीची कार्यपद्धत आहे आणि हीच कामाची पद्धत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानभवन येथे पत्रकारांशी बोलतांना केले. महायुतीमधील घटकपक्षांमधील काही आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यात अप्रसन्नता पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
यावर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी येऊन मला सांगितले की, एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी या पदाशिवाय मला दुसरे काही नको. हेच सर्वांत मोठे पद आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेही मला येऊन भेटले आहेत. नरेंद्र भोंडेकर यांनीही मला येऊन सांगितले आहे; पण हे लोक आता पुन्हा जोमाने काम करणार आहेत. आमचे दायित्व वाढले आहे. पदे येतात आणि जातात. मला काय मिळाले याहून महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे महत्त्वाचे आहे.