महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’साठी १०० कोटी रुपयांचा वापर ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

  • राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला दिलेले उत्तर

  • दुबईतून आले होते ६०० कोटी रुपये !

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

नागपूर – विधानसभा जिंकण्यासाठी विरोधकांनी ‘व्होट जिहाद’ची घोषणा दिली. मालेगाव येथील काही जणांच्या खात्यात ११४ कोटी रुपये जमा झाले. सिराज महंमद याने हे पैसे १४ खात्यांमध्ये वर्ग केले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ राज्यातूंन २०१ खात्यांमध्ये पैसे आले. हे पैसे १ सहस्र खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. यांतील ६०० कोटी रुपये दुबईतून आले होते. त्यामधील १०० कोटी रुपये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी वापरले गेले, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. १९ डिसेंबर या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना फडणवीस यांनी वरील आरोप केला.

‘देशाच्या निवडणुकीत परकीय शक्तींचा हस्तक्षेप झाल्याचे पुरावे संसदेत सादर झाले आहेत. आतंकवादविरोधी पथकाकडून याचे अन्वेषण चालू आहे. देशविरोधी शक्तींना बंदूक ठेवण्यासाठी विरोधकांनी स्वत:चा खांदा वापरायला देऊ नये’, असे आवाहन या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो अभियाना’त महाराष्ट्रातील ४० नक्षलवादी संघटनांचा सहभाग !

वर्ष २०२४ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात रा.रा. पाटील गृहमंत्री असतांना महाराष्ट्रातील ४८ नक्षलवादी संघटनांची नावे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘भारत जोडो अभियाना’त एकूण १८० संघटना सहभागी झाल्या होत्या. तत्कालीन गृहमंत्री रा.रा.पाटील यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या नक्षलवादी संघटनांपैकी ४० संघटना ‘भारत जोडो अभियाना’त सहभागी झाल्या होत्या.

१८ फेब्रुवारी २०१४ या दिवशी देशात काँग्रेसच्या सरकारकाळात लोकसभेत ७२ नक्षलवादी  संघटनांची नावे सादर करण्यात आली. त्यामधील ७ संघटना महाराष्ट्रातील होत्या. या सातही संघटना ‘भारत जोडो अभियाना’त सहभागी झाल्या होत्या. रा.रा. पाटील गृहमंत्री असतांना महाराष्ट्रातील आतंकवादविरोधी पथकाने ४० नक्षलवादी संघटनांची नावे केंद्र सरकारला पाठवली होती. त्यातील १३ संघटना ‘भारत जोडो अभियाना’त सहभागी झाल्या होत्या, अशा प्रकारे काँग्रेस आणि नक्षलवादी यांच्यातील साटेलोटे देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले.

उच्च न्यायालयांतील निकाल मराठी भाषेत देण्याची सूचना !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीला प्रथम राजभाषेचा दर्जा दिला. भारताच्या राज्यघटनेतील निकषानुसार मराठीला राजभाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे देशातील ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवता येईल. मराठी भाषा नवीन पद्धतीने रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करू. न्यायालयात मराठीचा उपयोग व्हायला हवा, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च न्यायालयांना सूचना केली आहे की, प्रत्यक्ष कामकाज मराठी भाषेतून होईपर्यंत निकाल मराठीत देण्याचे आवाहन त्यांनी केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई मेट्रोमधून प्रतिदिन १७ लाख नागरिक प्रवास करतील !

मुंबई ‘मेट्रो ३’चे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रोचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते सीप्स इथपर्यंतचे काम झाले आहे. यातून सध्या नियमित ६ लाख जण प्रवास करत आहेत. मेट्रो २ चे कुलाबापर्यंत काम मे २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी उपलब्ध करून देऊ. ‘मेट्रो २’मधून प्रतिदिन १७ लाख नागरिक प्रवास करतील. राज्यात ३७४ किलोमीटरचे जाळे सिद्ध करण्यात येईल. सध्या ७० किलोमीटरचा मेट्र्रोचा मार्ग कार्यरत आहे. पुणे आणि नागपूर येथीलही मेट्रोचे काम वेगाने चालू आहे, असे फडणवीस म्हणाले.

सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे राज्याची १० सहस्र कोटी रुपये वाचतील !

‘महाराष्ट्र राज्याने ‘सौरऊर्जा २.४’ प्रकल्प हाती घेतला आहे. सर्व शेतकर्‍यांना सौरऊर्जेद्वारे वीज देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकर्‍यांसाठी १६ सहस्र मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे. वर्ष २०२६ पर्यंत या विजेची निर्मिती होईल. सध्या प्रतियुनिट ८ रुपयाने वीज घेऊन सरकार शेतकर्‍यांना प्रतियुनिट वीज दीड रुपयाला देते. उर्वरित अनुदान सरकार देते. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकर्‍यांसाठीची वीज प्रतियुनिट ३ रुपयांना मिळेल. त्यामुळे अनुदानाचे १० सहस्र कोटी रुपये वाचतील’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.