पिंपरीत वास्‍तव्‍यास असलेल्‍या बांगलादेशी नागरिकांनी गोव्‍यातून पारपत्र काढले !

आतापर्यंत शहरातून ६४ बांगलादेशी नागरिकांनी पारपत्र काढल्‍याचे उघड !

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – गोव्‍यातील पारपत्र कार्यालयातून बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र (पासपोर्ट) काढून पिंपरी-चिंचवड शहरात २० बांगलादेशी नागरिकांनी वास्‍तव्‍य केल्‍याचे उघड झाले आहे. त्‍यांची पारपत्रे गोव्‍यातील पारपत्र कार्यालयातून रहित करण्‍यात आली आहेत. गोव्‍यामध्‍ये परदेशी नागरिकांचा सतत राबता असतो. त्‍यामुळे गोवा कार्यालयातून पारपत्र मिळाल्‍यावर व्‍हिसा मिळवण्‍यात अडचणी येत नाहीत. त्‍यामुळे बांगलादेशी घुसखोर हे गोव्‍यातून पिंपरी-चिंचवडच्‍या पत्त्यावर पारपत्र काढत होते. आतापर्यंत शहरातून ६४ बांगलादेशी नागरिकांनी पारपत्र काढल्‍याचे पोलिसांच्‍या अन्‍वेषणात उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्‍ये निगडीतील साईनाथनगर परिसरातून ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्‍यांनी बनावट कागदपत्रांच्‍या आधारे आधारकार्ड, पॅनकार्ड काढले होते. या आरोपींची टोळी असल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यांनी गोव्‍यातून पारपत्र काढले होते. १९ जणांनी सांगवीचा, तर एकाने पुण्‍यातील दत्तवाडी येथील पत्ता दिला होता. आरोपींचे पारपत्र पडताळणीसाठी सांगवी पोलिसांकडे आले होते. आरोपी बांगलादेशी असून, त्‍यांनी बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्‍यामुळे या सर्वांचे पारपत्र रहित करण्‍यात यावे, असे पत्र निगडी पोलिसांनी गोवा पारपत्र कार्यालयास जुलै २०२४ मध्‍ये दिले. त्‍यानुसार गोवा पारपत्र विभागाने या बांगलादेशी घुसखोरांचे पारपत्र रहित केल्‍याचे पत्र निगडी पोलिसांना २ दिवसांपूर्वी पाठवले आहे.

संपादकीय भूमिका

बनावट पारपत्रे निघतातच कशी ? यामध्‍ये पोलीस सहभागी आहेत का ? हे शोधणे आवश्‍यक !