शांत, संयमी आणि सात्त्विक वृत्तीचे चिंचवड (पुणे) येथील चि. केतन गंगाधर जोशी आणि नेतृत्‍वगुण असलेल्‍या अन् परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. विद्या विलास गरुड !

चि. केतन जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

चि. केतन जोशी

१. पू. श्रीमती सुलभा जोशीआजी (सनातनच्‍या १०४ व्‍या संत, चि. केतनची आजी, आईची आई, वय ८४ वर्षे), चिंचवड, पुणे. 

अ. ‘चि. केतन सात्त्विक आणि विनयशील आहे.

आ. तो इतरांना साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर असतो.

इ.  त्‍याच्‍यातील जिज्ञासू वृत्तीमुळे त्‍याला अनेक गोष्‍टी ठाऊक आहेत.

ई. तो त्‍याचे आजोबा कै. जगन्‍नाथ जोशी (चि. केतनच्‍या आईचे वडील, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के) यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील कात्रणे कापणे, ती वहीमध्‍ये व्‍यवस्‍थित चिकटवणे, यासाठी नियमित वेळ देत असे. त्‍याने बनवलेल्‍या या वह्या संग्रही ठेवल्‍या आहेत. त्‍यातील लिखाण अजूनही वाचता येते.’

२. सौ. अपर्णा जोशी (चि. केतनची आई), चिंचवड, पुणे.

अ. ‘चि. केतन स्‍वभावाने अतिशय शांत, संयमी आणि कष्‍टाळू आहे. तो मितभाषी आहे.

आ. त्‍याचे हस्‍ताक्षर सुंदर आहे. त्‍याने फलकलेखनाची (टीप) सेवा केली आहे. त्‍याने काही काळ दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या वितरणाचीही सेवा केली आहे.’

(टीप – फलकलेखन : फलकावर धर्मशिक्षणविषयक सूत्रे लिहिणे)


चि.सौ.कां. विद्या गरुड यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि.सौ.कां. विद्या गरुड

१. श्री. विलास गरुड (चि.सौ.कां. विद्याचे वडील, वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ. लहान वयात प्रशिक्षणवर्ग घेणे : ‘आम्‍ही साधनेत आलो, तेव्‍हा विद्या चवथ्‍या इयत्तेत शिकत होती. ती आमच्‍या समवेत सत्‍संगाला येत असे. त्‍या वेळी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू होते. विद्या पाचव्‍या इयत्तेत शिकत असतांना एका मैदानात प्रशिक्षणवर्ग घेत होती. त्‍या वेळी ५० ते ७० मुले उपस्‍थित असायची.

१ आ. सेवेची तळमळ : विद्याला लहानपणापासून साधनेची आवड आहे. ती शालेय शिक्षण घेत असतांना  प्रशिक्षणवर्ग घेणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, विज्ञापनांची संरचना करणे आणि अन्‍य प्रासंगिक सेवा करत असे. ती आश्रमात पूर्णकालीन साधना करतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांशी संबंधित सेवा तळमळीने करत असे.

१ इ. लहान भावाच्‍या विवाहात पुढाकार घेऊन साहाय्‍य करणे : तिचा लहान भाऊ श्री. सागर याचा विवाह निर्विघ्‍नपणे आणि सुनियोजितपणे पार पडण्‍याचे सर्व श्रेय विद्यालाच जाते. तिने या सेवेचे बारकाईने नियोजन केले होते.

१ ई. ती लहानपणापासून आमच्‍या चुका तत्त्वनिष्‍ठ राहून सांगते.

देवाने विद्याला ‘तत्‍परता, नियोजनकौशल्‍य, इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, तत्त्वनिष्‍ठता, शिकण्‍याची वृत्ती, सेवा परिपूर्ण करणे’ इत्‍यादी अनेक गुण दिले आहेत.’

२. सौ. विमल गरुड (चि.सौ.कां. विद्याची आई, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ अ. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणे : ‘विद्या लहानपणापासून सेवेत आणि आश्रमात राहिल्‍यामुळे सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करायला शिकली. प.पू. गुरुमाऊलींच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने विद्या प्रत्‍येक कृती साधना म्‍हणून करते. तिचा ‘प्रत्‍येक कृतीतून चैतन्‍य ग्रहण करायचे’, असा भाव असल्‍यामुळे त्‍यातून सर्वांनाच चैतन्‍य अनुभवता येऊन आनंद घेता येतो.

‘प.पू. गुरुमाऊलीने तिला कसे घडवले !’, हे अनुभवण्‍याची संधी दिल्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

३. श्री. सागर विलास गरुड (चि.सौ.कां. विद्याचा लहान भाऊ) आणि सौ. पूजा सागर गरुड (चि.सौ.कां. विद्याची वहिनी) 

३ अ. पूर्णवेळ साधना करण्‍याची आवड : ‘विद्याचे शिक्षण पूर्ण झाल्‍यानंतर तिला आय. टी. क्षेत्रातील नामांकित आस्‍थापनात नोकरी मिळाली होती; मात्र तिची साधना करण्‍याची इच्‍छा असल्‍याने तिने २ मासांतच  नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्‍यास आरंभ केला.

३ आ. नियोजनकौशल्‍य  

१. ती प्रत्‍येक सेवेतील संभाव्‍य अडचणींचा बारकाईने विचार करून सेवा सुरळीत होण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना करते. त्‍यामुळे सेवा सहजतेने होते.

२. तिने आमच्‍या घरी होणार्‍या गणेशोत्‍सवाची पूर्वसिद्धता ते गणेशमूर्ती विसर्जन यांमधील सेवांचे बारकाईने लेखी नियोजन करून ठेवले आहे. त्‍यामुळे आम्‍हाला प्रतिवर्षी वेगळे नियोजन करावे लागत नाही.

३ इ. तिची आश्रमातील लहान मुले, तसेच वयस्‍कर साधक यांच्‍याशी चांगली जवळीक आहे.’ 

४. श्रीमती कमल आनंदा गरुड (चि.सौ.कां. विद्याची काकू, वय ६५ वर्षे)

४ अ. आधार देणे : ‘एकदा माझे शस्‍त्रकर्म होणार असतांना मी रुग्‍णालयात भरती होते. तेव्‍हा विद्या गोवा येथे होती. ती गोवा येथे नवीन असूनही तिने रुग्‍णालयातील सर्व गोष्‍टी एकटीनेच पूर्ण केल्‍या. तेव्‍हा तिचे मला पुष्‍कळ साहाय्‍य झाले. मला तिचा पुष्‍कळ आधार वाटला.’

५. सौ. सानिका संतोष गावडे (चि.सौ.कां. विद्याची चुलत बहीण), कोल्‍हापूर सेवाकेंद्र

अ. ‘विद्यामध्‍ये ‘प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे’ हे गुण पुष्‍कळ आहेत.

आ. तिच्‍यात सेवेची तीव्र तळमळ आहे. तिच्‍या घरी एखादा कार्यक्रम असतांना ती वेळ मिळाल्‍यास आश्रमात  जाऊन सेवा करते. ती सतत सेवेत आणि सत्‌मध्‍ये रहाते.’

६. सौ. अपर्णा जोशी (विद्याच्‍या भावी सासूबाई), चिंचवड, पुणे.

अ. ‘विवाह निश्‍चित होण्‍याच्‍या काळात चि.सौ.कां. विद्याने विवाहानंतरही सेवेला प्राधान्‍य देण्‍याचा विचार व्‍यक्‍त केला. तेव्‍हा तिच्‍यातील ‘तळमळ, दृढ निश्‍चय आणि गुरूंप्रती श्रद्धा’ हे गुण माझ्‍या लक्षात आले.

आ. ती विवाहासाठी अलंकार खरेदी करत असतांना ‘इतरांनाही काय योग्‍य वाटते ?’,  हे विचारून घेऊन खरेदी करत होती. तेव्‍हा मला तिच्‍यातील ‘इतरांचा विचार घेणे, नम्रता, सारासार विचार करणे’, हे गुण जाणवले.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपल्‍याच कृपाशीर्वादाने चि. केतन आणि चि.सौ.कां. विद्या यांचा विवाहसोहळा आम्‍ही अनुभवणार आहोत. तुमची कृपादृष्‍टी सदैव आमच्‍या कुटुंबावर असू दे’, अशी आपल्‍या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ४.१२.२०२४)