भक्‍तीयोग जाणून घेतांना…

११ डिसेंबर या दिवशी ‘गीता जयंती’ झाली. त्‍या निमित्ताने…

‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्‍यास अत्‍यंत कठीण आहे. त्‍यासाठी विशिष्‍ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्‍य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्‍तीयोगा’चे माहात्‍म्‍य सांगून सर्वसामान्‍य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी भक्‍तीमार्ग अत्‍यंत सुलभ आहे. भगवान श्रीकृष्‍ण भगवद़्‍गीतेच्‍या ‘विभूतीयोग’ या १० व्‍या अध्‍यायात सांगतात…‘यज्ञानां जपयज्ञोऽस्‍मि’, म्‍हणजे ‘सर्व प्रकारच्‍या यज्ञांमध्‍ये जपयज्ञ मी आहे.’  ज्ञानाचा विचार केला, तर ज्ञानप्राप्‍तीसाठी बुद्धीवर अवलंबून रहावे लागणार आहे. सामान्‍य माणसांना तेजस्‍वी बुद्धी लाभलेली असतेच, असे नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी ज्ञानमार्ग हा खडतर आणि अशक्‍य ठरतो.

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘कर्मयोग आणि भक्‍तीयोग यांतील भेद, भक्‍तीमार्गाविषयी आद्यशंकराचार्य आणि लोकमान्‍य टिळक यांचे उद़्‍गार, जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि लोकमान्‍य टिळक यांच्‍या दृष्‍टीने भक्‍तीभाव अन् समर्थ रामदासस्‍वामी यांना भक्‍तीभावामुळे विठ्ठलात रामाचे दर्शन होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/862631.html

६. व्‍यक्‍तीने अखंड साधना करणे महत्त्वाचे 

यो यो यां यां तनुं भक्‍तः श्रद्धयार्चितुमिच्‍छति ।
तस्‍य तस्‍याचलां श्रद्धां तामेव विदधाम्‍यहम् ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ७, श्‍लोक २१

अर्थ : जो जो सकाम भक्‍त ज्‍या ज्‍या देवतास्‍वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्‍छितो, त्‍या त्‍या भक्‍ताची त्‍याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो.

अशा प्रकारे अखंड साधना भक्‍त करू लागला की, त्‍याची चित्तशुद्धी होऊ लागते. यथावकाश या भक्‍तीमुळेच भक्‍ताच्‍या भावना सुधारत जातात. भक्‍ताला परमेश्‍वराचे ज्ञान होते आणि जळीस्‍थळी, काष्‍ठी, पाषाणी, जनी, विजनी, शयनी, नयनी सर्वत्र वासुदेव भरून राहिला आहे, अशी भक्‍ताच्‍या मनाची अवस्‍था होऊन उपासना करणारा अन् ज्‍याची उपासना करतो, ती देवता यात कोणताही भेद राहिलेला नाही. याचा अनुभव येऊन ब्रह्मानंदात आत्‍म्‍याचा लय होतो.

माणसाने मात्र अखंडपणे साधना आणि प्रयत्न करणे चालू ठेवायचे आहे. एवढीच महत्त्वाची अट आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

७. ‘गीता धर्मा’चा सिद्धांत 

कर्मयोगाची नुसती जिज्ञासा उत्‍पन्‍न झाल्‍यासह माणूस चक्राच्‍या तोंडात सापडल्‍याप्रमाणे पूर्ण सिद्धीकडे ज्‍याप्रमाणे ओढला जातो, त्‍याप्रमाणे भक्‍ती मार्गातही भक्‍ताने एकदा आपल्‍याला परमेश्‍वराच्‍या हवाली केले, म्‍हणजे त्‍याची निष्‍ठा वाढवत वाढवत भगवान त्‍याला आपल्‍या स्‍वरूपाचे पूर्ण ज्ञान करून देतात. त्‍या ज्ञानाने भगवंताच्‍या भक्‍ताला अखेरीस पूर्ण सिद्धी प्राप्‍त होते, हा गीता धर्माचा सिद्धांत आहे.

८. कोणत्‍याही मार्गाने साधना केल्‍यास भगवंताशी एकरूप होण्‍याविषयी भगवान श्रीकृष्‍णाने केलेले विवेचन

भक्‍ती मार्गावरून प्रगती करत करत अखेरची प्राप्‍त होणारी स्‍थिती आणि ज्ञान मार्गाने वाटचाल करतांना प्राप्‍त होणारी अखेरची स्‍थिती या दोन्‍ही स्‍थितीत कोणत्‍याही प्रकारचा भेद नाही. ज्ञानमार्गात प्रारंभीपासून बुद्धीच्‍या द्वारे ज्ञान प्राप्‍त केलेले असते, तर भक्‍ती मार्गात तेच ज्ञान श्रद्धेने प्राप्‍त केलेले असते. कोणत्‍याही मार्गाने प्राप्‍त केलेले ज्ञान सारखेच असते, त्‍यात श्रेष्‍ठ आणि कनिष्‍ठ, असा भेद करता येत नाही. हाच नियम ईश्‍वरप्राप्‍तीसाठी अनुसरलेल्‍या सर्व प्रकारच्‍या मार्गांना समप्रमाणात लागू आहे.

श्रद्धावाँल्‍लभते ज्ञानं तत्‍परः संयतेन्‍द़्रियः ।
ज्ञानं लब्‍ध्‍वा परां शान्‍तिमचिरेणाधिगच्‍छति ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ४, श्‍लोक ३९

अर्थ : जितेंद्रिय, साधनतत्‍पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो अन् आणि ज्ञान प्राप्‍त झाल्‍यावर तो तात्‍काळ भगवद़्‍प्राप्‍तीरूप परम शांतीला प्राप्‍त होतो.

भत्तया त्‍वनन्‍यया शक्‍य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्‍टुं च तत्त्वेन प्रवेष्‍टुं च परन्‍तप ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ११, श्‍लोक ५४

अर्थ : परंतु हे परंतपा (अर्थात् शत्रुतापना) अर्जुना, अनन्‍य भक्‍तीने या प्रकारच्‍या चतुर्भुजरूपधारी मला प्रत्‍यक्ष पहाणे, तत्त्वतः जाणणे, तसेच (माझ्‍यात) प्रवेश करणे अर्थात् (माझ्‍याशी) एकरूप होणेही शक्‍य आहे.

अशी ग्‍वाही भगवंताने दिली आहे.

९. भक्‍त भगवंताशी एकरूप होणे किंवा भगवंताला जाणून घेणे यांविषयी…

भक्‍त भगवंताला केव्‍हा जाणू शकतो, हे भगवंताने सांगतांना म्‍हटले,

‘भत्तया मामभिजानाति यावान्‍यश्‍चास्‍मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्‍वा विशते तदनन्‍तरम् ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय १८, श्‍लोक ५५

अर्थ : त्‍या पराभक्‍तीच्‍या योगाने तो मज परमात्‍म्‍याला मी जो आणि जसा आहे, अगदी बरोबर तसाच तत्त्वतः जाणतो, तसेच त्‍या भक्‍तीने मला तत्त्वतः जाणून त्‍याच वेळी माझ्‍यात प्रविष्‍ट होतो.’

भगवंताची भक्‍ती करता करता परमेश्‍वराच्‍या ठिकाणी भक्‍ताचे चित्त हळूहळू स्‍थिरावत जाते. भक्‍ताचे चित्त भगवंताच्‍या ठिकाणी स्‍थिरावल्‍यानंतर भक्‍ताची भेदबुद्धी क्षणभरही मागे रहात नाही.

अशा प्रकारे भक्‍त भगवंताशी एकरूप झाला की, त्‍याला जो अनुभव येतो, तो संत जगद़्‍गुरु तुकाराम महाराज यांनी सुयोग्‍य शब्‍दांत त्‍यांच्‍या अभंगातून व्‍यक्‍त केला आहे. तो असा…‘अणुरणीया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥’

(क्रमशः सोमवारच्‍या दैनिकात)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक आणि व्‍याख्‍याते, डोंबिवली. (९.१२.२०२४)

या लेखाचा यापुढील भाग वाचण्या करिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/863942.html