मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – जनता जेव्हा ‘आमदार’ म्हणून निवडून पाठवते, तेव्हा त्यांना आपल्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा असते. आपण या सभागृहाचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये पालट घडवून आणण्यासाठी करू, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे आमदारांनी सभागृहात गोंधळ घालणे किंवा सभात्याग करणे हे चुकीचे आहे. विधानसभेच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी सभागृहाची शिस्त पाळायला हवी. विधानसभेच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे आवाहन विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मनोगत व्यक्त करतांना केले.
या वेळी राहुल नार्वेकर म्हणाले,
१. विधानसभेची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आपल्यावर दायित्व आहे. येणार्या काळात हे दायित्व योग्य प्रकारे पार पाडू. अधिकाधिक कामकाज करून सभागृहाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू.
२. आमदारांसाठी निवासव्यवस्था नसल्यामुळे मागील ६ वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींची अडचण झाली. येत्या एका वर्षात ‘मॅजिस्टिक’ आमदार निवास, तर २ वर्षांत ‘मनोरा’ आमदार निवास सुसज्जपणे उपलब्ध होईल.
३. विरोधी बाकावर अल्प आमदार असले, तरी सर्वांना समान संधी देण्याचे माझे दायित्व राहील. विरोधकांचा आवाज अल्प असला, तरी त्यांचा आवाज मी न्यून होऊ देणार नाही.
४. सध्याच्या विधीमंडळाच्या वास्तूचे काम वर्ष १९८० मध्ये झाले आहे. विधीमंडळाच्या परिसरात मूलभूत सुविधांचा विकास करण्याचा मी प्रयत्न करीन. विधीमंडळाचा दर्जा वाढेल, अशा सुविधा निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
अध्यक्षपदाद्वारे सर्व जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करीन ! – राहुल नार्वेकर‘विरोधकांनी सभात्याग करण्यापेक्षा चर्चा करण्यावर भर द्यावा. त्यांचे मत संपूर्णपणे जाणून घेतले जाईल. ‘अध्यक्ष’ म्हणून त्यांना न्याय देण्याचे माझे दायित्व राहील. यापुढे सभात्यागासारखे प्रकार सदनामध्ये होऊ नयेत, अशी मी अपेक्षा बाळगतो. माझ्यासाठी विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. अध्यक्षपदाच्या माध्यमातून सर्व जनतेला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करीन’, असे राहुल नार्वेकर म्हणाले. |