मुख्यमंत्रीपदाचा विश्वासदर्शक ठराव बहुमताने संमत !
मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी ९ डिसेंबर या दिवशी भाजपचे आमदार अधिवक्ता राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली. ८ डिसेंबर या दिवशी अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्याकडून एकमात्र प्रस्ताव आला असल्यामुळे सभागृहात त्यांची बिनविरोध निवड झाली. अधिवक्ता राहुल नार्वेकर सलग दुसर्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात बाळासाहेब भारदे यांच्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद दुसर्यांना भूषवणारे राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीचा विश्वासदर्शक ठराव सभागृहात बहुमताने संमत झाला.
सकाळी ११ वाजता विधानसभेला प्रारंभ झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहाला ओळख करून देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदी अधिवक्ता राहुल नार्वेकर यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावांना अनुक्रमे आमदार अनिल पाटील, आमदार आशिष शेलार आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अन् विरोधी पक्षांकडून आमदार नाना पटोले यांनी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेले. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या जागी सभागृहाचे स्थायी अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी कार्यभार स्वीकारला.
अध्यक्षांच्या निवडीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत, रोहित पाटील, विश्वजीत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार उदय सामंत, डॉ. संजय कुटे, आमदार दिलीप वळसे पाटील आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्रीपदाचा विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव मतास टाकला. मुख्यमंत्रीपदाच्या म्हणजेच सरकारच्या बहुमताचा हा ठराव विश्वासदर्शक ठराव बहुमताने संमत करण्यात आला.