श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने ‘मातृपितृ इच्‍छापूर्ती’ दिवस (शिवप्रतापदिन) उत्‍साहात !

कोल्‍हापूर येथे शिवप्रतापदिनाच्‍या प्रसंगी उपस्‍थित श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ

कोल्‍हापूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने ‘मातृपितृ इच्‍छापूर्ती दिवस’ अर्थात् शिवप्रतापदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या निमित्ताने प्रतिष्‍ठानच्‍या वतीने शिवतीर्थावर अफझलखानवधाचा भव्‍य फलक लावण्‍यात आला होता. या दिनाच्‍या निमित्ताने सकाळी १० वाजता शिवतीर्थापासून पदयात्रा काढण्‍यात आली. यात अग्रभागी भगवा झेंडा, अफझलखानवधाचा फलक लावून राष्‍ट्रप्रेम जागृत करण्‍यात करणारी गीते म्‍हणण्‍यात आली. शिवतीर्थापासून निघालेली पदयात्रा विविध मार्गांवरून जाऊन तुळजाभवानी मंदिर येथे समाप्‍त करण्‍यात आली. पदयात्रेच्‍या प्रसंगी आतषबाजी करून, साखर-पेढे वाटण्‍यात आले. तत्‍पूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीची विधीवत् पूजा करण्‍यात आली.

कोल्‍हापूर येथे श्री शिवप्रतापदिनाच्‍या निमित्ताने काढण्‍यात आलेली पदयात्रा

या प्रसंगी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री आशिष पाटील, सुमेध पवार, रोहित अतिग्रे, आदित्‍य जासूद, अवधूत चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी, ‘हिंदु एकता आंदोलना’चे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, ‘महाराजा प्रतिष्‍ठान’चे संस्‍थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्‍हापुरे, श्री. कपिल केसरकर यांसह धारकरी, हिंदुत्‍वनिष्‍ठ मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

पदयात्रेच्‍या अग्रभागी असलेल्‍या श्री. शुभम नेताजी साठे आणि त्‍यांच्‍या हलगी पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सायंकाळी इचलकरंजी येथे श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने हा दिवस उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

सांगली येथे श्री शिवप्रतापदिनाच्‍या निमित्ताने काढण्‍यात आलेली पदयात्रा

सांगली – सांगली शहरातही उत्‍साहात पदयात्रा काढण्‍यात आली. सांगलीत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्‍थिती होती. याच प्रकारे मिरज शहर, पलूस यांसह राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍ह्यात श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने श्री शिवप्रतापदिन उत्‍साहात साजरा करून पदयात्रा काढण्‍यात आल्‍या.


अफझलखानवधाचा फलक लावण्‍याविषयी महापालिका प्रशासनाकडून संदिग्‍ध भूमिका !

कोल्‍हापूर येथे शिवतीर्थावर लावण्‍यात आलेला अफझलखानवधाचा फलक !

८ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थावर अफझलखानवधाचा फलक लावण्‍यासाठी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानने महापालिकेकडे अनुमती मागितली होती. ‘पुतळा परिसरात फलक उभारण्‍यासाठी महापालिकेचे धोरण ठरलेले नाही. पुतळा परिसरात सुशोभिकरणाच्‍या अनुषंगाने अफझलखानवधाच्‍या फलकाची उभारणी करणे सयुक्‍तिक होणार नाही’, असे संदिग्‍ध उत्तर महापालिका प्रशासनाच्‍या वतीने देण्‍यात आले. धारकर्‍यांनी सत्‍य इतिहास लोकांसमोर आणण्‍यासाठी ७ डिसेंबरच्‍या रात्री शिवतीर्थावर हा फलक उभा केला. (संदिग्‍ध भूमिका घेणारी महापालिका भारतातील कि पाकची ? – संपादक)