US Walmart ShriGanesh Denigration Controversy : ‘वॉलमार्ट’ संकेतस्थळाने श्री गणेशाचे चित्र असणारी चप्पल आणि पोहण्यासाठीची वस्त्रे यांची विक्री थांबवली !

अमेरिकेतील हिंदूंच्या विरोधाचा परिणाम !

ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ‘वॉलमार्ट’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या संकेतस्थळावर भगवान श्री गणेशाची चित्र असणारी चप्पल आणि पोहण्यासाठीची महिलांची वस्त्रे ठेवल्याने हिंदूंनी संताप व्यक्त केला. ‘हिंदू अमेरिकन फाऊंडेशन’ने वॉलमार्टवर धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप करत या उत्पादनांची विक्री तातडीने थांबवण्याची मागणी केली होती. त्यांनी वॉलमार्टला पत्र लिहून याची जाणीव करून दिल्यानंतर वॉलमार्टने संकेतस्थळावरून ही उत्पादने काढून टाकली. यानंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने वॉलमार्टचे आभार मानले. ही उत्पादने विकली जात होती; मात्र ती भारतात खरेदीसाठी उपलब्ध नव्हती.

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर वॉलमार्टने त्याच्या संकेतस्थळावर   अशा उत्पादनांच्या विक्रीबद्दल खेद व्यक्त केला. यामुळे खरोखरच धार्मिक भावना आणि विश्‍वास दुखावला जात असल्याचे वॉलमार्टनेही मान्य केले.

संपादकीय भूमिका

अमेरिकेतील हिंदूंचे अभिनंदन ! भारतात हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांचे विविध माध्यमांतून विडंबन होत असतांना ते रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !