Syria Civil War : सीरियातून बाहेर पडा !

भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

नवी देहली – मध्य-पूर्वेतील इस्लामी देश सीरियामध्ये २७ नोव्हेंबरपासून यादवी युद्ध चालू झाले आहे. येथील बंडखोरांनी ३ मोठ्या शहरांवर नियंत्रण मिळावले आहे. ते राजधानी दमास्कसच्या दिशेने कूच करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या असून भारतीय नागरिकांना सतर्क रहाण्यास सांगितले आहे. भारतीय नागरिकांनी सीरियात प्रवास करणे टाळावे. तसेच सीरियात असलेल्या भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर सीरिया सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सध्या सीरियात असलेल्या भारतीय नागरिकांनी दमास्कस शहरातील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, सीरियामधील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. सीरियात ९० भारतीय नागरिक आहेत. ज्यांपैकी १४ जण संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांसाठी काम करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.