शपथविधीनिमित्त एस्.टी. बँकेकडून साखर-पेढे वाटप !
कोल्हापूर – देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर एस्.टी. बँकेतील संचालक-कर्मचारी यांनी बसस्थानक परिसरात साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या प्रसंगी संचालक संजय घाटगे, निशांत चव्हाण, अरुण पाटील, अविनाश चोपडे यांसह वाहक-चालक उपस्थित होते.
मद्यपीकडून पोलिसाला नोकरी घालवण्याची धमकी !
पिंपरी(पुणे) – वृद्ध महिलेला साहाय्य करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मद्यपान केलेल्या व्यक्तीने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच ‘चिंचवडचे आमदार माझ्या ओळखीचे आहेत’, असे सांगत नोकरी घालवण्याची धमकी दिल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रवीण पाईकराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजय साठे याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. एका वृद्ध महिलेच्या साहाय्यासाठी पाईकराव आणि गुव्हाडे हे पोलीस गेले असतांना साठे तिथे आला. त्याने नशेत पोलिसांना धक्का देऊन ढकलून दिले. अश्लील शिवीगाळ केली आणि धमकी दिली.