मुंबई – अल्-कायदाकडून प्रेरणा घेऊन स्थापन केलेल्या ‘अन्सारुल्ला बांगला टीम’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना साहाय्य केल्याप्रकरणी पुणे येथे रहाणार्या ३ बांगलादेशी घुसखोरांना विशेष न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. बनावट कागदपत्रांच्या आधारे या बांगलादेशी घुसखोरांनी ‘पॅनकार्ड’, ‘आधार ओळखपत्र’, ‘मतदार ओळखपत्र’, ‘शिधापत्रिका’ आदी कागदपत्रे मिळवल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केला होता.
महंमद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि महंमद अझरअली सुभानल्ला अशी शिक्षा ठोठावलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. वर्ष २०१८ मध्ये पुणे येथील धोबीघाट, तसेच भैरोबानाला येथे अवैधरित्या रहात असल्याप्रकरणी पोलिसांनी या बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये या प्रकरणी न्यायालयाने २ जणांना दोषी ठरवले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय सिमकार्ड मिळवणे, अधिकोषात खाती उघडणे, नोकरी मिळवणे आदी प्रकार या बांगलादेशी घुसखोरांनी केल्याचे पुरावे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून न्यायालयात सादर करण्यात आले होते. अन्सारुल्ला बांगला टीम या आतंकवादी संघटनेला या बांगलादेशी घुसखोरांनी अर्थसाहाय्य करून राष्ट्रविरोधी कारवायांनाही पाठबळ दिल्याचे पुरावे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात सादर केले होते.