पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१. साधिकेने भाववृद्धी होण्यासाठी केलेल्या  कृती पू. अश्विनीताईंनी प्रत्यक्षात अनुभवणे 

काही वेळेला मी सूक्ष्मातून पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या खोलीत जाते. तेव्हा मी लहान बाळ होऊन त्यांच्या मांडीवर बसल्यावर त्या मला कुरवाळतात. कधी कधी त्या मला मिठीत घेतात. नंतर मी खोलीच्या बाहेर येऊन माझी व्यष्टी आणि समष्टी सेवा करते. त्या वेळी माझ्या मनातील अनावश्यक विचार आणि निराशा दूर होऊन माझा नामजप चांगला होतो. तसेच काही वेळ मला भावावस्थेत रहाता येते.

सौ. मीना खळतकर

२८.९.२०२४ या दिवशी पू. (सौ.) अश्विनीताई, पू. शिवाजी वटकरकाका आणि मी एकाच पटलावर महाप्रसाद घेत होतो. तेव्हा ‘साधना’ या विषयावर चर्चा चालू होती. त्या वेळी मी पूज्य ताईंना वरील भावप्रयोगाविषयी सांगितले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘काही वेळा मलाही असे वाटते की, ‘मी आई आहे आणि सर्व साधक माझी बाळे आहेत. ती माझ्या मांडीवर बसली आहेत आणि मी त्यांना कुरवाळत आहे. साधकांच्या भावानुसार देवच मला ती स्पंदने जाणवून देतो.’’

२. पू. (सौ.) अश्विनी पवार यांची आध्यात्मिक महानता 

पुढे विषय चालू असतांना पू. ताई म्हणाल्या, ‘‘मला लहानपणापासून एकच माहिती होते की, ‘मला शिष्य बनायचे आहे.’ त्यासाठी देव मला सतत सेवारत ठेवतो. कधी मला अनावर झोप येत असते किंवा त्रास होत असतो. तेव्हा मला काहीतरी सेवा सांगितली जायची. त्या वेळी मला वाटायचे की, ‘माझ्यावर किती गुरुकृपा आहे ! गुरुमाऊली माझी क्षमता वाढवत आहे. ती मला सेवेचे स्मरण करून देते आणि सेवा करण्यासाठी शक्तीही देते.’ एकदा माझा डोळा लागला होता. तेव्हा ‘काहीतरी खाली पडले आहे’, हे देवाने माझ्या लक्षात आणून दिले. तसेच एकदा मला झोप येत असतांना ‘एका साधिकेला महत्त्वाचा निरोप द्यायचा राहिला आहे’, हे देवाने माझ्या लक्षात आणून दिले आणि मी ती सेवा करून घेतली. अशा प्रकारे देवच माझ्याकडून सेवा करून घेतो. तेथे माझे अस्तित्व नसते. भरभरून सेवा देऊन गुरुमाऊली माझ्यावर भरभरून कृपा करत आहे.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘पूज्य ताई, तुमच्या चेहर्‍यावर पुष्कळ चकाकी दिसत आहे.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हो. ‘माझ्याभोवती प्रकाश फिरत आहे’, असे मलाही जाणवत असते. यातून माझ्यात सकारात्मकता आणि गुरुकार्याची तळमळ या गुणांची वाढ देवच करून घेतो. मला झोप येईपर्यंत मी सेवाच करत असते.’’ यांतून मला पू. ताईंमधील गुरूंवरील श्रद्धा, झोकून देऊन सेवा करणे, वात्सल्यभाव, गुरुकार्याचा ध्यास आणि आपलेपणा या गुणांचे दर्शन झाले.’

‘गुरुमाऊली, पूज्य ताईंसारखी तळमळ माझ्यामध्ये वाढू दे. मला स्वतःला विसरून सेवा करता येऊ दे. देवाची कृपा आणि देवाचे अस्तित्व क्षणोक्षणी मला अनुभवता येऊ दे. मला भावामध्ये रहाता येऊ दे. सर्व संतांचे गुण आत्मसात् करण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक