कोल्हापूर – काँग्रेसचा इतिहासच देशाला धोका देण्याचा आहे. काँग्रेससाठी देश कधीच महत्त्वाचा नव्हता. त्यामुळेच ‘यूपीए’ सरकारच्या काळात पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया वाढल्या होत्या. काँग्रेसने संमती दिल्यामुळेच देशाची फाळणी झाली आणि देशाचे दोन तुकडे झाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे घर निजामांनी जाळले होते. त्यामुळे मी ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणल्यावर खर्गे यांना राग का येतो ? खर्गे यांनी लोकांना खरा इतिहास सांगून निजाम कोण होता, ते सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते कोल्हापूर येथे तपोवन मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.
या प्रसंगी व्यासपिठावर शिवसेनेचे उमेदवार श्री. राजेश क्षीरसागर, भाजपचे उमेदवार श्री. अमल महाडिक, भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की,
१. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससमवेत कधीच युती केली नसती. असे आहे, तर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे काँग्रेससमवेत का युती करत आहेत ? उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मूल्यांना बाजूला करून काँग्रेससमवेत युती केली.
२. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाचे चित्र पालटले असून आज देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान भारतावर आक्रमण करण्याचे धाडस करत नाही; कारण त्याला ‘प्रत्युत्तर दिले जाईल’, याची भीती वाटते. भाजपच्या काळात भव्य असे श्रीराममंदिर उभारण्यात आले. देशातील अनेक योजनांचा लाभ नागरिकांना होत आहे.
३. त्या वेळचे जे निजामाचे रझाकार होते, त्यांचे वंशज आज हिंदूंच्या उत्सवांवर दगडफेक करत आहेत. गडदुर्गांवर अतिक्रमण करत आहेत. महायुती सरकारच्या काळात हे सर्व चित्र पालटले जाईल.
क्षणचित्रे
१. योगींनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी नमन करून भाषणाला प्रारंभ केला.
२. सभेसाठी सकाळपासूनच युवकांनी गर्दी केली होती. तरुणांमध्ये योगीजींना पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आकर्षण दिसून आले.
महाराष्ट्राने देशाला थोर पुरुष दिले !
महाराष्ट्राने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाला लढायला शिकवले आहे. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा महाराष्ट्राने दिली. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सर्व थोर पुरुष महाराष्ट्राने देशाला दिले आहेत ! त्यामुळे महाराष्ट्राचे स्थान देशपातळीवर महत्त्वाचे आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. महायुती सरकारच्या काळात यापुढे हिंदूंच्या उत्सवावर कुणी दगडफेक करणार नाही ! भाजप, महायुती सरकारच्या काळात यापुढे गणेशोत्सव मिरवणूक अथवा हिंदूंच्या उत्सवावर कुणी दगडफेक करणार नाही; कारण त्यांना माहिती आहे की, जर तसे केले, तर उत्तरप्रदेशचा कायदा इथे लागू होईल. महायुती सरकार आल्यावर विशाळगडावरील अतिक्रमणही आपोआप निघेल. |