बेंगळुरू (कर्नाटक) – येथील रामेश्वरम् कॅफे उपाहारगृहामध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे पाकिस्तान आणि कुख्यात आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेट यांच्याशी संबंध आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिली. फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या या स्फोटाच्या प्रकरणी मुसावीर हुसेन शाजिब, अब्दुल मतीन अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले होते. हे सर्व जण त्यांच्या पाकिस्तानी हस्तकांच्या सूचनेनुसार भारतात घातपात घडवण्याचे काम करत होते. या स्फोटातील मुख्य आरोपी अद्याप पसार आहे. तो पाकिस्तानात असल्याचा संशय आहे.
१. कॅफेतील स्फोट एकूण ६ आतंकवाद्यांनी मिळून केला होता. हे सर्व जण इस्लामिक स्टेटशी संबंधित आहेत. त्यांनी बाँबस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. आठवडाभर चाललेल्या या प्रशिक्षणासाठी त्यांनी स्फोटके बनवण्याचे साहित्य ऑनलाईन खरेदी केले होते.
२. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी बेंगळुरूतील भाजपच्या मुख्यालयात हा स्फोट घडवण्याची योजना होती; मात्र त्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे आरोपींना ते शक्य झाले नाही. अखेर त्यांनी बेंगळुरूमधील रामेश्वरम् कॅफेमध्ये स्फोट घडवून आणला.