नमाजपठणासाठी शुक्रवारी सुट्टी मिळत असेल, तर मंगळवारी हनुमान चालिसासाठी का मिळू नये ? – Assam CM

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा प्रश्‍न

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

रांची (झारखंड) – शुक्रवारी नमाजपठण करण्यासाठी शाळा बंद ठेवल्या जाऊ शकतात, तर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणण्यासाठी शाळा का बंद ठेवल्या जाऊ शकत नाहीत ?, असा प्रश्‍न आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी झारखंडमधील एका जाहीर सभेत उपस्थित केला. झारखंडमध्ये २ टप्प्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की,

१. आम्ही हिंदू जातीयवादी नाही. राज्यघटना बनवली जात असतांना घटना सभेतील सर्व लोक हिंदु होते. ‘देशात मंगळवारी सुट्टी असावी’, असे आम्ही म्हणू शकलो असतो; पण आम्ही तसे केले नाही. रविवारी शाळा बंद ठेवाव्यात, हे आम्ही मोठ्या मनाने मान्य केले; पण आज शुक्रवारी झारखंडमध्ये शाळा बंद होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही शुक्रवारी शाळा बंद करू शकत असाल, तर मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचे धाडस आमच्यात आहे.

२. गेल्या वर्षी झारखंडमधील जामतारा नंतर दुमका जिल्ह्यातील ३३ शाळांमध्ये शुक्रवारी साप्ताहिक सुट्टीचे सूत्र समोर आल्याने हा वाद वाढला होता. त्याच वेळी बिहामधील किशनगंजमध्ये अशा शाळांची संख्या ३७ असल्याचे सांगण्यात आले. आधी झारखंड आणि नंतर बिहार राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये बर्‍याच दिवसांपासून शाळा रविवारी उघडल्या जात होत्या आणि शुक्रवारी सुट्टी होती; मात्र या प्रकरणाला वेग आल्याचे पाहून बिहारमधील शिक्षण विभागाचे मंत्री विजय कुमार चौधरी यांनी चौकशीचा आदेश दिला होता. त्यांनी संबंधित जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला होता.