कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी १८ जून २०२३ या दिवशी ब्रिटीश कोलंबियातील सरे येथे खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील सध्याचे राजनैतिक संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या माहितीच्या आधारे कथितपणे या हत्येचा सूत्रधार भारत असल्याचा ट्रुडो यांचा दावा भारताकडून त्वरित फेटाळण्यात आला. निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी कॅनडाला कच्ची माहिती पुरवली आणि ट्रुडो यांनी त्यांच्या आरोपाला दुजोरा देण्यासाठी ती चुकीची माहिती सादर केली. यानंतर भारताने कॅनडाच्या आणि कॅनडाने भारताच्या राजदूतांना स्वदेशात माघारी जाण्यास सांगितले आहे. यानंतर दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध बिघडले आहेत. याचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत…
१. खलिस्तानी आतंकवादाचा वाढता धोका
कॅनडा आणि कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे दोन्ही ठिकाणी सक्रीय असलेली खलिस्तानी आतंकवादी संघटित गुन्हेगारी अन् गटाने जमून हिंसाचार करणे या कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा अमेरिकेच्या गुप्तहेरांना हत्येच्या कटांविषयी जाणीव होते, तेव्हा ते मित्र आणि शत्रू या दोघांनाही सतर्क करतात. उदाहरणार्थ दोन दशकांपूर्वी अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना हत्येच्या कटाविषयी चेतावणी दिली होता. तथापि निज्जरच्या हत्येच्या प्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचरांनी कॅनडाला केवळ नियमित आणि स्वैर माहिती दिली, तसेच भारताच्या सहभागाविषयी स्पष्ट चेतावणी दिली नाही. ट्रुडो यांनी परिस्थितीचे बेपर्वाईने चुकीचे वर्णन केल्यामुळे कॅनडाचे भारताशी महत्त्वपूर्ण राजनैतिक मतभेद निर्माण झाले आहेत.
२. ट्रुडो यांच्या राजकीय चुका आणि देशांतर्गत अपयश
ट्रुडो यांच्या खोट्या आरोपांमुळे केवळ कॅनडा-भारत संबंधच बिघडले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या देशातील नागरिकांनाही वेगळे पाडले आहे. जवळजवळ ९ वर्षे पदावर राहिल्यानंतर ट्रुडो यांच्या पुरोगामी वर्तनाचे संकेत आणि क्षमतेचा अभाव यांमुळे कॅनडाचे लोक अधिकाधिक निराश होत आहेत. कोविड महामारीचे कठोर निर्बंध, आर्थिक अस्थिरता आणि आर्थिक घोटाळे यांनी त्यांच्या प्रशासनाला ग्रासले आहे. त्यांच्या देशातील प्रमुख जिल्ह्यांमधील शीख आतंकवाद्यांकडून मते मिळवण्याच्या उद्देशाने ट्रुडो यांनी अलीकडे उचललेल्या चुकीच्या पावलांमुळे उलटा परिणाम झाला आहे.
३. गुप्तचर यंत्रणेचा गैरवापर आणि राजनैतिक परिणाम
राजकीय लाभासाठी ‘फाईव्ह आईज’ या आघाडीच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीचा गैरवापर करून ट्रुडो यांनी या गटातील कॅनडाची स्थिती धोक्यात आणली आहे. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ आणि ‘राष्ट्रीय सुरक्षा संस्था’ (एन्.एस्.ए.) या दोन्ही संस्थांना ट्रुडो यांनी त्यांना हाताळण्याचा प्रयत्न केल्यामुळे राग आला होता; कारण ट्रुडो यांनी दाव्यांची पुष्टी करणे किंवा नाकारणे यांमुळे स्रोत अन् कार्यपद्धत यांच्याशी तडजोड करावी लागू शकते. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना गुप्तचर विभागाने सहकार्य करण्याविषयीचे संबंध ताणले गेले. त्यामुळे कॅनडाचे त्याच्या मित्रराष्ट्रांशी मतभेद निर्माण झाले आहेत.
४. धार्मिक अतिरेकीपणा आणि वैध धार्मिक प्रथा यांविषयी गैरसमज
धार्मिक अतिरेकीपणा आणि वैध धार्मिक प्रथा यांतील भेद ओळखण्यामध्ये ट्रुडो यांचे अपयशही या संकटाला कारणीभूत ठरले आहे. उदाहरणार्थ धार्मिक अतिरेकीपणाविषयी अमेरिकेच्या ‘ब्लूम रिव्ह्यू’मध्ये ‘खलिस्तानी कार्यकर्ते त्यांचा किरकोळ ‘अजेंडा’ (कार्यसूची) पुढे नेण्यासाठी सरकारी अज्ञान कसे हाताळतात’, हे अधोरेखित केले आहे. या पुनरावलोकनाचा निष्कर्ष असा आहे की, खलिस्तान समर्थकांच्या सक्रियतेचा व्यापकदृष्ट्या सर्व शीख समुदायावर नकारात्मक परिणाम होतो आणि तो सहन केला जाऊ नये, या अंतर्दृष्टीकडे ट्रुडो यांनी दुर्लक्ष केले आहे.
५. कॅनडाचे आतंकवादाला खतपाणी
खलिस्तानी आतंकवाद्यांना मुक्तपणे काम करण्याची अनुमती देऊन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा ‘आतंकवादाचे सुरक्षित आश्रयस्थान’ म्हणून कॅनडाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. ट्रुडो आणि त्यांचे वडील पियरे ट्रुडो या दोघांनीही ऐतिहासिकदृष्ट्या खलिस्तानी आतंकवादाकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे हा आतंकवाद कॅनडामध्ये भरभराटीला आला आहे. ट्रुडो यांच्या ढिसाळ वृत्तीमुळे कॅनडा हा आतंकवादाला निधी पुरवण्यासाठी आणि परदेशातून निर्देशित केलेल्या कारवायांसाठी एक तळ बनला आहे.
६. पाश्चिमात्य सरकारांचा ढोंगीपणा
देशामध्ये आतंकवादाचे प्रायोजक नियुक्त करण्याविषयीचा निवडक दृष्टीकोन स्पष्ट आहे. आतंकवादात सहभागी असल्याकारणाने इराण आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशांवर वारंवार टीका केली जात असतांना पाश्चिमात्य देश त्यांच्या स्वतःच्या सीमेवर होणार्या अशाच वर्तनाकडे अनेकदा डोळेझाक करतात. हा ढोंगीपणा आतंकवादाचा सामना करण्याच्या जागतिक प्रयत्नांना कमकुवत करतो. खलिस्तानी आतंकवाद्यांना आश्रय देऊन कॅनडा इतर राष्ट्रांना उद्देशून ज्या कृतीचा निषेध करतो, त्याच कृतीसाठी तो दोषी आहे.
‘एअर इंडिया फ्लाईट १८२’च्या बाँबस्फोटासह खलिस्तानी आतंकवादाचा प्रदीर्घ इतिहास पहाता कॅनडा यापुढे या चळवळीमुळे घडणार्या हिंसाचाराविषयी अज्ञान असल्याचा दावा करू शकत नाही. कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांचे अन्वेषण न केल्यास ते ‘अल कायदा’सारखेच प्राणघातक ठरू शकतात. ‘अल कायदा’ने वापरलेल्या हवाला जाळ्यांप्रमाणेच कॅनडाच्या बँका या आतंकवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्यात सहभागी आहेत. काही हवाला एजंटांनी वर्ष १९९० च्या दशकात आणि २००० च्या दशकाच्या प्रारंभीला ‘अल कायदा’ला आक्रमणांसाठी आर्थिक हस्तांतर सुलभ केले. दुर्दैवाने ट्रुडो यांची धोरणे आता कॅनडाला सीमेवरील आतंकवादी कारवायांचा सामना करण्यास इच्छुक नसलेल्या देशांच्या श्रेणीमध्ये ठेवत आहेत.
७. भारताने ठोस कारवाईसाठी पावले उचलणे महत्त्वाचे !
आतंकवादातील स्वतःच्या सहभागाकडे दुर्लक्ष करण्याची पाश्चिमात्य देशांची प्रवृत्ती आतंकवादविरोधी जागतिक प्रयत्नांना कमकुवत करते. कॅनडाला ‘आतंकवादाचा प्रायोजक देश’ म्हणून घोषित करून भारत एक शक्तीशाली संदेश देऊ शकतो. केवळ राजकीय पवित्रा नव्हे, तर आर्थिक दडपशाही, अटक आणि प्रत्यार्पण हे आतंकवादाचा पराभव करण्याचे खरे मार्ग आहेत. जर कॅनडाला पुढील छाननी टाळायची असेल, तर त्याने ठोस सुधारणा केल्या पाहिजेत आणि खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठिंबा देणे थांबवले पाहिजे. पाश्चिमात्य देशांना विश्वासार्हता परत मिळवण्यासाठी, म्हणजेच कॅनडासारख्या देशांनी अनियंत्रितपणे वाढू दिलेल्या आतंकवादी प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
जागतिक आवाहन !
अनेक देश त्रुटी दूर करण्यासाठी आणि अवैध निधीवर कारवाई करण्यासाठी पावले उचलत असतांना कॅनडा उलट दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते. तुर्कीये, पाकिस्तान आणि इराण यांसारख्या देशांवर आतंकवादाला पाठिंबा दिल्याविषयी बर्याच काळापासून टीका केली जात आहे. आता ट्रुडो यांचा कॅनडा देश त्यांच्या श्रेणीत सामील होण्याचा धोका आहे. जागतिक संस्थांना बळकट करण्यासाठी आणि देशांना उत्तरदायी धरण्यासाठी भारताने ‘कॅनडाला खलिस्तानी आतंकवाद्यांना संरक्षण देण्यासाठी अन् आतंकवादाचा प्रायोजक देश’ म्हणून घोषित करण्याचा विचार केला पाहिजे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
संपादकीय भूमिकाखलिस्तान्यांना पाठिंबा देणार्या कॅनडा, पाकिस्तान यांना ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी भारताने मुत्सद्देगिरीने प्रयत्न करणे आवश्यक ! |